लातूर : कोणी खुर्चीसाठी तर कोणी संपत्तीसाठी देव पाण्यात ठेवतात मात्र लातूर जिल्ह्यातील महिलांनी पावसासाठी ग्रामदैवतालाच पाण्यात कोंडले आहे. पावसाने मागील दोन महिन्यापासून पाठ फिरवल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. दुष्काळातून मुक्ती मिळावी, पाऊस पडून पेरण्या व्हाव्यात यासाठी वडवळच्या महिलांनी ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथाला पाण्यात कोंडले आहे. जोपर्यंत पाऊस पाडत नाही तोपर्यंत देवाला पाण्यात कोंडू ठेवू असे म्हणत ग्रामस्थांनी ग्रामदैवताच्या नावाने जयघोष केला आहे.


पावसाळा संपत आला आहे तरीही लातूर जिल्हात फक्त पंधरा टक्केच पाऊस झाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात उन्हाळ्यापेक्षा भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. ग्रामीण भागात शेतकरी पेरणीसाठी तयार बसला होता मात्र चढ़यावर मूठच धरता आली नाही कारण एकच पावसाने पाठ फिरवली. सर्व उपाय करून झाले मात्र पाणी बरसतच  नाही. दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. यामुळे वडवळ मंगळवार ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथ मंदिरातच साकडे घालण्याचे ठरवले.

गावाच्या महिला सरपंच शिल्पा बेंडके यांच्या पुढाकाराने गावातील शेकडो महिलांनी मंदिरातील स्वयंभू महादेवाच्या पिंडीला पाण्यात कोंडून ठेवण्याचा निर्णय घेतला. आता तूच तारणहार अशी आर्त हाक ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथला घालण्यासाठी गावातील अनेक महिला,शेतकरी डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन ओल्या कपड्यांनी मंदिरात हजर झाल्या. गाभाऱ्यात पाणी भरण्यात आले. जोपर्यंत पाऊस पाडत नाही तोपर्यंत ग्रामदैवत वटसिद्ध नागनाथला पाण्यात कोंडून ठेवू असा भोळा भाव व्यक्त करण्यात आला आहे. यावेळी ओम नमः शिवायचा गजर करुन उपस्थित महिलांनी नागनाथांकडे पाऊस पडावा यासाठी प्रार्थना केली. याशिवाय परिसरातील अनेक गावात शेतकरी डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन ओल्या कपड्यांनी वेगवेगळ्या गावच्या मारुतीला जलाभिषेक घालण्याचा कार्यक्रम सुरु आहे. पाऊस पडून दुष्काळ हटावा यासाठी ग्रामस्थ आता दैववादच्या भरोश्यावर आहेत

पावसासाठी सरकार कृत्रिम पावसाचे प्रयोग करत आहे, मात्र निसर्गापुढे मनुष्य हतबल आहे पावसाने दिलेला ताण शेतकऱ्याचा चिंता वाढविणारे आहे .. ग्रामीण भागातील महिलाना पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे .. जनावरे माणसे पाण्यासाठी व्याकुळ झाली आहेत आता ग्रामदैवताशिवाय आम्हाला काहीच दिसत नाही तो एकच तारणहार आहे असे मत गावाच्या महिला सरपंच शिल्पा बेंडके यांनी व्यक्त केलं आहे.