Latur News: बंद करा ... बंद करा ..दारू विक्री बंद करा... अशा घोषणा देत लातूरच्या उदगीर (Latur Udgir News) तालुक्यातल्या दावणगाव येथील विद्यार्थ्यांनी गावात ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. या मोर्चाला गावातील महिलांसह नागरिकांनी साथ दिली.  दावणगाव उदगीर तालुक्यातील एक मोठं गाव आहे. या गावात मागील अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री करणारे कार्यरत आहेत. या सहज उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे गावातील तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. दारुच्या व्यसनाने अनेकांचे संसार मोडले आहेत तर यामुळं आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण झाले आहेत. 


याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. उदगीर ग्रामीण पोलिसात देखील याबाबत माहिती दिली होती, मात्र अवैध दारू विक्रीला लगाम बसू शकला नाही.  यामुळे संतप्त होत गावातील दोन शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी एकत्र येत गावातून जनजागरण रॅली काढली. यात मोठ्या संख्येने गावातील महिलांनी घराबाहेर पडत उपस्थिती नोंदवली होती.


दारू विक्री बंद नाही झाली आणि यातील दोषी लोकांवर कारवाई नाही झाली तर पुढील आंदोलन यापेक्षा तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी विद्यार्थी आणि नागरिकांनी दिला आहे. दावणगाव येथील बहुतांश गावकरी शेती व्यवसाय करतात. गावातील अनेक कुटुंबं मोलमजुरी करुन गुजराण करतात. यात काही मंडळी मात्र व्यसनाच्या आहारी गेली आहे. हाताला चार पैसे आले की कुटुंबातील व्यक्ती दारूचा अड्डा जवळ करतो.  नित्यनियमाने दारू पिणे आणि गावात गोंधळ घालणं असा अनेकांचा दिनक्रम झाला आहे. यामुळे गावात सामाजिक शांतता बिघडली आहे.  याचा थेट परिणाम कुटुंबांवर होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील याचा परिणाम होत आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबाची अर्थव्यवस्था पार मोडकळीस आली आहे.


दावणगावामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीस अनेक वेळा दारू विक्री करू नको असं सांगण्यात आलं होतं.  याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली होती. मात्र याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. गावात उघडपणे दारू विक्री सुरूच आहे. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आपला आवाज उठवण्यासाठी आज मोर्चाचं आयोजन केलं.


आमच्या मागण्या संविधानिक पद्धतीने मान्य झाल्या नाही तर उदगीर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल आणि तिथूनही मागण्या मान्य नाही झाल्या तर लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरही मोर्चा काढण्यात येणार असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलं आहे. प्रत्येक ठिकाणी आम्ही लोकशाही मार्गाने आमचा प्रश्न मांडतोय. प्रशासनानं आमच्या मागण्याची दखल जर घेतली नाही तर आत्मदहनाशिवाय आमच्या समोर पर्याय नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया गावातील नागरिक शिवाजी भोळे यांनी दिली आहे. 


ही बातमी देखील वाचा


Maharashtra Border Dispute: आम्हाला महाराष्ट्र सोडून जायचंय! उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाडा विदर्भापर्यंत सीमेलगतच्या गावांचा महाराष्ट्रपासून फारकत घेण्याचा इशारा