लातूर : नरेंद्र मोदींनी जीएसटी आणल्यावर निधीवाटपाच्या निकषांमुळे लातूर महापालिकेचा बँड वाजल्याचा आरोप केला जात आहे. एवढी मोठी पालिका दिवाळखोरीत गेल्याने शहराचा विकास थांबला आहे.
लातूर महापालिकेत महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाणांचं तैलचित्र आहे. महापालिका स्थापन झाल्यावर सभागृहात हे चित्र लावण्यात आलं होतं. पण आज या 2.5 बाय 4 फुटाच्या तैलचित्रासाठी रंग द्यायलाही पालिकेकडे पैसे नाहीत.
लातूर महापालिकेचा वार्षिक खर्च 100 कोटी. वार्षिक उत्त्पन्न 25 कोटी रुपये. त्यामुळे जमणार कसं? हा प्रश्नच आहे. खुद्द महापालिकेचे आयुक्त कौस्तुभ दिवेगावकरच दोन महिन्यांपासून आपला पगार झाला नसल्याचं सांगतात.
पथदिव्यांची वीज कापली जाणं, पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा बंद होणं, अशा घटना अधून मधून घडतात. पालिकेकडे स्वतःची 1100 दुकानं आहेत. पण दुकानदार पोटभाडेकरु ठेवून पैसे कमावतात. त्यामुळे पालिका कंगाल.
पालिका कर्मचाऱ्यांना डांबर हातात घेऊन खड्डे भरावे लागतात. महाराष्ट्रातल्या सगळ्या महापालिका, नगरपालिकांची लातूर मनपासारखीच दयनीय अवस्था आहे.
नगरसेवकांच्या मनमानी, भ्रष्ट कारभारामुळे पालिका मोडकळीला आल्या आहेत. करांची वसुली करु नये, यासाठी राजकीय मंडळी दबाव आणतात. त्यामुळे अमेरिकेतल्या डेट्रॉइट शहराने घोषित केली, तशी दिवाळखोरी महाराष्ट्रातल्या कोणत्या शहरानं आणि कधी जाहीर करायची एवढाच मुद्दा आहे.