ग्रामीण भागातील मुलींना मिळणार बारावीपर्यंत एसटीचा मोफत पास
एबीपी माझा वेब टीम | 25 Sep 2018 05:31 PM (IST)
एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणारा मोफत प्रवासाचा लाभ आता बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे.
मुंबई | एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. ग्रामीण भागातील दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणारा मोफत प्रवासाचा लाभ आता बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींना मिळणार आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ही घोषणा केली आहे. एसटी महामंडळाकडून विविध प्रकारच्या प्रवास सवलती दिल्या जातात. या प्रवास सवलतींची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात एसटी महामंडळाने सादर केलेल्या प्रस्तावाला आज मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यात प्रामुख्याने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी त्यांना बारावीपर्यंत मोफत प्रवास सवलत पास देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत ही प्रवास सवलत दहावीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी देण्यात येत होती. तसंच 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आता शिवशाही बससाठीही प्रवास सवलत लागू करण्यात आली आहे. सोबतच पत्रकारांनाही वातानुकूलित शिवशाही बसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. याशिवाय इतर विविध समाजघटकांना एसटी बसमध्ये प्रवासासाठी सवलतींची घोषणा दिवाकर रावतेंनी केली आहे. या सवलतींचा लाभ राज्यातील सुमारे 2 कोटी 18 लाख लाभार्थ्यांना होणार आहे. एसटी महामंडळाच्या विविध प्रवास सवलत योजनांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तसंच नवीन योजनाही सुरु करण्यात येणार आहेत.