आजमितीला या धरणात 7.40 दलघमी पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. 43 वर्ग किलोमीटर पसरलेले हे पात्र आता कोरडे पडत चालले आहे. 250 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा करु शकणारे हे मांजरा धरण आहे. मागील 37 वर्षात 12 वेळा धरणात 100 टक्के पाणी साठा झाला होता. 2017 साली धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र 2018 साली कमी पावसाने धरण त्यावर्षी भरलेच नाही. त्याचा फटका यावर्षी बसत आहे. त्यातचं यंदा पावसाने पाठ फिरवल्या कारणाने धरण कोरडे पडत आहे.
आजघडीला लातूर शहराला दहा दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. रोज 32 एमएलडी पाणी शहरासाठी उचलले जात आहे. तसेच लातूर एमआयडीसी साठी हि वेगळे आरक्षण देण्यात आले आहे. लातूर शहराला येत्याकाळात पाणीटंचाई भेडसावणारं असल्याचे चित्र समोर दिसत आहे. इतर ठिकाणावरुनहि काही प्रमाणात पाण्याची सोय होण्याची चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत. जिल्ह्यातील दोन मोठे प्रकल्प आठ मध्यम आणि 132 लघु प्रकल्प कोरडे पडत चालले आहेत. यात क्षमतेच्या सोळा टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या सर्व कारणामुळे पाणीबाणी तीव्र होणार आहे.
लातूर : मांजरा नदीपात्रात 8 फूट लांब आणि 150 किलोची मगर
यावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आली आहे. यातून काही प्रमाणत पाणीटंचाईवर मात केली जात आहे. लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 109 गावांना 117 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. 754 गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केल्या जात आहे. भर पावसाळ्यात उन्हाळ्यापेक्षा जास्त अधिग्रहण आणि टँकरने पाणी देण्याची वेळ आली आहे. येत्याकाळात पावसाने साथ दिली नाहीतर परस्थिती यापेक्षाही बिकट होण्याची चिन्हे आहेत.
अशी स्थिती असताना मात्र लातूर महानगरपालिका प्रशासनाकडून अद्याप उपाययोजना काय केल्या जाव्यात याचा कोणताही कृती आराखडा तयार नाही. पाणीटंचाई संधर्भात सर्वसाधारणसभेत किंवा स्थायी समितीत चर्चा होताना दिसत नाही.
"ज्याप्रकारे पाऊस पडायला पाहिजे तसा पाऊस पडत नाही आहे. येणाऱ्या काळात पाऊस नाही पडला तर सर्व उपायोजना करावयाचे सूचना प्रत्येक विभागाला देण्यात आल्या आहेत. पाऊस पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो परंतू वार्षिक सरासरीच्या फक्त पंधरा टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात 26 टक्केच पेरणी झाली आहे. ग्रामीण भागात टँकर आणि अधिग्रहणद्वारे पाणीपुरवठा करत आहोत. पिकविमासाठी काय करता येईल याची उपाययोजना सध्या सुरु आहे. आम्ही सर्व त्या उपाय योजना करत आहोत", असे मत लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे.
"आता जर पावसाने पाठ फिरवली तर दिवाळीपर्यंत लातूरकरांना तग धरता येईल मात्र पुढील सात ते आठ महिने काय असा प्रश्न आम्हाला सतावत आहे. पुन्हा रेल्वे ने पाणी आणणार किती? सर्वसामन्य लोकांनी काय करावे" असा सवाल अमोल गावंडे यांनी विचारला आहे.
DRONE EXCLUSIVE : बीडमधलं मांजरा धरण आभाळातून असं दिसतं!
"शहरापेक्षा ग्रामीण भागात बिकट अवस्था आहे. जळकोट तालुक्या सारख्या कायम अवर्षणग्रस्त भागात शेतीच्या पाण्याचा प्रश्नच मिटला आहे कारण आता धडपड सुरु आहे ती पिण्याच्या पाण्याची. जनावरे कशी जगावावी याची चिंता पशुपालकांना सतावत आहे. आता आमच्या समोर स्थलांतर करण्याशिवाय पर्याय राहिला नाही"असे मत जिल्हापरिषदचे गटनेते संतोष तिडके यांनी व्यक्त केले आहे.
"भर पावसाळ्यात लातूरकर पाणी टंचाईला सामोरे जात आहेत. महापालिका प्रशासनाने गेल्यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन यावर्षीच्या मध्यापर्यंत केले होते. त्यानुसार शहराला दहा दिवसाआड का असेना पाणीपुरवठा करु शकलो. पावसाने पाठच फिरवल्या कारणाने आता पर्यायी व्यवस्था काय करता येईल याची चाचपणी सुरु आहे. आपण आशा करु परतीचा पाऊस काही प्रमाणात सहकार्य करेल" असे मत भाजपाचे नगरसेवक शैलेश स्वामी यांनी व्यक्त केले आहे.
VIDEO | लातूरात अनेक ठिकाणी नळांना तोट्या नसल्यानं पाण्याची नासाडी | एबीपी माझा