लातूर : वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेणाऱ्या लातूरच्या मयुरी चांडकनं समाजापुढे नवा आदर्श घालून दिला आहे. वडिलांच्या पश्चात कोटीच्या उलाढालीचा व्यवसाय सांभाळणाऱ्या मयुरीची कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे.


चांडक कुटुंबात लग्नाच्या तयारीची धामधूम सुरु आहे. कारण मयुरीचं लग्न आहे. घरचा कर्ता अचानक गेल्यानंतर दोन वर्षांनी घरात आनंदसोहळा होत आहे.

खरं तर मयुरी स्वप्नाळू आहे... पण मुरुड गावाला तिची ओळख वेगळीच आहे... कारण मयुरी तब्बल एक कोटींची उलाढाल असलेल्या इलेक्ट्रिशिअनचं दुकान सांभाळते.

मयुरी पुण्यात इंटेरिअर डिझाईनचा कोर्स करत होती... 2014 साली वडिलांचं निधन झालं. ध्यानीमनी नसताना मयुरीवर दुकानाची आणि कुटुंबाची जबाबदारी पडली. वडिलांच्या अंत्यविधीला निघाले तेव्हाच ठरवलं की आता कुटुंब सांभाळायचं.

स्विच किती प्रकारचे... स्क्रु किती... लाईट फिटींगच्या वायर 3 आठच्या किती.. 2 आठच्या किती हे काहीच कळत नव्हतं. पण सहा महिन्यात मयुरी तयार झाली... नफ्या-तोट्याचं गणित समजायला वर्ष लागलं

मारवाडी समाज तसा दरवाज्याआड राहणारा... त्या समाजातली शिक्षित मयुरी भर चौकातलं दुकान कसं चालवणार अशी शंका होती. कधी अढ्यातखोर ग्राहक भेटले, काही व्यापाऱ्यांनी चलाखीचा प्रयत्न केला. पण मयुरीनं दुकानातला तणाव कधीही घरी आणला नाही.

येत्या 3 डिसेंबरला मयुरीचं लग्न आहे. पण घरची जबाबदारीही ती पार पाडत आहे. लग्नानंतरही दर 15 दिवसांनी मुरुडला येऊन मयुरी दुकान पाहणार आहे. भविष्यात जमलंच तर ऑनलाईन व्यवसाय करण्याची मयुरीची इच्छा आहे. त्यामुळे घराच्या वंशाला मुलगाच हवा असा हट्ट धरणाऱ्यांनी मयुरीकडे पाहावं.