मुंबई : नोटाबंदीचा निर्णय जाहीर होऊन तब्बल 22 दिवस उलटून गेले आहेत, मात्र पुरेशी रोकड बँक आणि एटीएममध्ये उपलब्ध नसल्यानं पगाराच्या दिवशी नागरिकांच्या भल्यामोठ्या रांगा बघायला मिळत आहेत. बँक खात्यातून पैसे काढण्यावर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आठवड्याला तुम्ही बँक खात्यातून 24 हजार रुपयेच काढू शकता.


अनेक ठिकाणी एटीएममध्ये पैसे नसल्यानं लोकांची निराशा झाली. तर काही बँकांमध्ये मोजक्याच लोकांना पुरतील एवढी रक्कम होती. त्यामुळे खात्यात पगार जमा होऊनही जमाना नाखूश होता.

दुसरीकडे बाजारामध्येही खरेदीचा उत्साह पूर्णपणे मावळलेला दिसत आहे. कारण म्हणजे सुट्ट्या पैशांचा घोळ. ज्यांना पैसे मिळत आहेत, त्यांना बहुतेक वेळा दोन हजाराच्या नोटा हाती लागत आहेत. त्यामुळे कुणी सुट्टे देता का सुट्टे असं म्हणण्याची वेळ आली आहे.

तिकडे जिल्हा बँका, शेड्यूल्ड बँका आणि सहकारी बँकांचा पुरता बँड वाजला आहे. कारण रिझर्व्ह बँकेकडून नियमित आणि पुरेसा पतपुरवठा होत नसल्यामुळे ज्यांचे पैसे अशा सहकारी बँकांमध्ये अडकलेत, त्यांची चांगलीच अडचण झाली आहे.