लातूर : राज्यात पाणीप्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. पाण्यासाठी लोकांची वणवण होत असून यामुळे लोकप्रतिनिधींना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. लातूर जिल्ह्यातील हालसी गावात पाणीप्रश्नामुळे सरपंचास ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. संतप्त ग्रामस्थांनी पाण्यासाठी सरपंचाला मारहाण केली आहे.  राजू गंगथडे असे या सरपंचाचे नाव आहे.


हालसीत मागील अनेक दिवसांपासून पाणी प्रश्न बिकट बनला आहे. ग्रामस्थांनी एकत्र येत तीस हजार रुपयांची लोकवर्गणी गोळा केला. गावासाठी शासकीय तीन विंधन विहिरी मंजूर झाल्यात मात्र त्या दोनशे फुटापेक्षा जास्त घेता येत नाहीत. यामुळे तीस हजार खर्चून पुढील काम करावे असे ठरले होते. सरपंच राजू गंगथडे यांनी मात्र आचारसंहिताचे कारण देत काम केले नाही. यामुळे काल संतप्त ग्रामस्थांनी सरपंचास चोप दिला. या प्रकरणाची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे.

दुष्काळी कामांसाठी आचारसंहितेचे कारण नको
दुष्काळी कामांसाठी आचारसंहितेचे कारण नको, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 'ऑडीओ ब्रीज' तंत्रज्ञानाने मुख्यमंत्री सध्या सरपंच, ग्रामसेवकांसह जिल्हाधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांशी संवाद करत आहेत. दुष्काळी कामांना आचारसंहिता लागू नाही, निवडणूक आयोगाने दुष्काळी कामे करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आचारसंहितेचे कारण देऊन दुष्काळावरील उपाययोजनांची कामे प्रलंबित ठेऊ नयेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.