खारफुटीच्या झाडांच्या मुळांवर ही बुरशी आढळून येते. एसपरगिलस या गटातील ही बुरशी आहे. मनीषा सांगळे, मोहमद शाहनवाज आणि डॉ अविनाश आडे यांनी हे संशोधन केले आहे. 2014 पासून यावर ते काम करत होते. या बुरशीमुळे पॉलिथीन या प्लास्टिकच्या प्रकारातील रेणू (मोलेक्युल) हे कमकुवत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याचे विघटन करण्याची पद्धत सोपी होते असेही त्यांना आढळले.
या संशोधनाची दखल नेचर मॅगझीननेही घेतली आहे. हे संशोधन सिद्ध करणारा रिसर्च पेपर एप्रिल महिन्यातील नेचर मॅगझीनमध्ये प्रसिद्ध झाला आहे. पण हे संशोधन प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी काही वेळ लागेल असे संशोधक आणि प्राध्यापक अविनाश आडे यांनी सांगितले.
संशोधकांनी सांगितले की, "हा या संशोधनाचा पहिला टप्पा आहे. याचा प्रत्यक्ष वापर सुरू होण्यासाठी यावरच आधारित संशोधनाच्या पुढच्या पायऱ्या पार कराव्या लागतील. साधारणपणे 5 वर्षांनंतर याचा प्रत्यक्ष वापर होऊ शकेल. या संशोधनाचं पेटंट घेण्यासाठीही विभागाकडून प्रयत्न केले जाणार आहेत."