अहमदनगर : अहमदनगरमधील पारनेरच्या निघोजमध्ये घडलेल्या कथित ऑनर किलिंग प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं आहे. हे प्रकरण ऑनर किलिंगचं नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तशा संबंधीचा अहवालही पोलिसांनी तयार केला आहे. आंतरजातीय विवाह केल्याने वडिलांनी मुलगी रुक्मिणी आणि जावई मंगेश रणसिंग या दोघांना जाळल्याची माहिती समोर आली होती. यात मुलगी रुक्मिणीचा मृत्यू झाला तर जावई मंगेश हा जखमी झाला आहे.

या प्रकरणी आता आता पोलिसांनी 169 प्रमाणे एक अहवाल पारनेर कोर्टात सादर केला आहे. आता पोलिस रुक्मिणीचा नवरा मंगेश रणसिंग याचा जबाब घेणार आहेत. दरम्यान या प्रकरणी पकडलेल्या तीनही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे.

काय आहे प्रकरण?

सुरुवातीच्या माहितीनुसार, अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील निघोजमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने 1 मे रोजी मुलगी आणि जावयाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवलं होतं. या घटनेत मुलगी रुक्मिणी रणसिंगचा मृत्यू झाला होता. तर जावई मंगेश रणसिंग जखमी झाला होता. या दोघांचा सहा महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. परंतु मुलीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हतं.

लग्नानंतर रुक्मिणी माहेरी राहायला आली होती. त्यावेळी मंगेश तिला भेटण्यासाठी तिथे आला होता. यावेळी रुक्मिणीचे वडील, काका आणि मामा यांनी मंगेशला बेदम मारहाण केली. त्यानंतर रुक्मिणी त्याच्यासोबत जाण्यासाठी निघाली असता, तिघांनी त्यांना एका खोलीत डांबलं आणि अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं. दोघांना उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु गंभीर भाजल्याने मुलीचा मृत्यू झाला होता तर जावयावर उपचार सुरु आहेत.

या प्रकरणीत पोलिसांनी मृत रुक्मिणीचे वडील, मुलीचे काका आणि मामा यांना अटक केली होती. मात्र आता हे ऑनर किलिंगचं प्रकरण नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

संबंधित बातम्या

अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयाला पेटवलं

अहमदनगर 'सैराट' हत्याकांड, मुलीसह जावयाला पेटवणाऱ्या नराधम बापाला अटक