लातूर : एखाद्या सिनेमात शोभावा असा प्रसंग लातुरात एका आजीबाईंना अनुभवयास मिळाला. एकुलता एक मुलगा सांभाळत नसलेल्या या आजीबाईंना लातूर-उदगीर रस्त्यात 'श्रावणबाळ' भेटला. तो ‘श्रावणबाळ’ दुसरा-तिसरा कुणी नसून लातूरचे जिल्हाधिकारी 'जी. श्रीकांत' हे होय.

नेमकं काय घडलं?

6 जुलैचा प्रसंग. जळकोट तालुक्यातील धोंडवाडीत राहणाऱ्या आपल्या लेकीला भेटून आजीबाई आपल्या घरी म्हणजे उदगीर तालुक्यातील अंजनासोंडा पाटीवर गावी परतत होत्या. लेकीच्या घरातून निघाल्यावर त्या रस्त्यात गाडीची वाट पाहत उभ्या होत्या. त्यावेळी एका गाडीला आजीबाईंनी हात दाखवून थांबवलं.

प्रवासी कार समजून आजीबाई कारमध्ये बसल्या आणि एका अविश्वसनीय प्रवासाला सुरुवात झाली. मुळात आजीबाई घरी पोहोचेपर्यंत त्यांच्यासाठी यात 'अविश्वसनीय' असं काहीच नव्हतं. कारण त्यांच्या समजुतीप्रमाणे त्या एका ‘प्रवासी कार’मध्ये बसल्या होत्या. आपण नक्की कुणाच्या गाडीत बसलो आहोत, याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.

ज्या व्यक्तीच्या गाडीत आजीबाई बसल्या होत्या, त्या गाडीतील सूट-बुटातील एका व्यक्तीने आजीबाईंची विचारपूस केली. अत्यंत आस्थेने सारी चौकशी केली. त्यानंतर गाडीतल्या त्या व्यक्तीला आजीबाईंची सारी माहिती कळली.

आजीबाईंचा एकुलता एक मुलगा त्यांना सांभाळत नाही. त्यामुळे घरची स्थिती हालाखीची. मुलीचाच काय तो आजीबाईंना आधार होता. अशी एकंदरीत हृदयद्रावक कथा आजीबाईची होती.

आपलं खाच-खळग्याचं जगणं सांगत आजीबाई आणि त्या कारमधील व्यक्तीचा प्रवास आजीबाईंच्या गावापर्यंत येऊन ठेपला. आजीबाई उतरल्या आणि घरी गेल्या.

वाचा : लो प्रोफाईल IAS, जी श्रीकांत यांच्या नोटीस बोर्डला लातूरकरांचं लाईक्स!

त्याचवेळी तिकडे प्रशासनात वेगवान हालचाली सुरु झाल्या. या प्रसंगाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 7 जुलै रोजी आजीबाईंच्या घरी तलाठी येऊन धडकले. त्यांनी 'श्रावणबाळ' योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रं आजीबाईंकडून जमा केले आणि लवकरच अनुदान सुरु होण्याचा विश्वास दिला.

त्यावेळी तलाठ्यांनीच आजीबाईंना सांगितलं की, काल ज्यांच्यासोबत तुम्ही प्रवास केलात, ते दुसरे-तिसरे कुणी नसून, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत होते.

आजीबाईंना स्वत:चे अश्रू अनावर झाले. एकुलता एक मुलगा सांभाळत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या रुपाने देवाने आपल्यासाठी दुसरा मुलगा पाठवून दिल्याच्या भावना आजीबाईंनी भरल्या डोळ्यांनी व्यक्त केल्या.

जी. श्रीकांत हे लातूरमध्ये जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्याआधी अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. एक कर्तव्यदक्ष अधिकारी आणि संवेदनशील माणूस म्हणून ते ओळखले जातात. त्यांच्या याच गुणांचा अनुभव पुन्हा एकदा पाहावयास मिळाला.

https://twitter.com/praveengedam/status/883602382944444417