लातूर : गणेशोत्सव जवळ आला की डॉल्बीच्या परवानगीचा विषय चर्चेत येतो. रात्री दहापर्यंत नव्हे, तर बारा वाजेपर्यंत परवानगी द्या, अशी ओरड दरवर्षीच होते. आई किंवा बहिणीचं परवानगी पत्र आणा, मी परवानगी देतो, असं भावनिक आवाहन करत लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गणेश मंडळाच्या पूर्वतयारी बैठकीत गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शांत केलं.


गणेशोत्सव पूर्वतयारीची बैठक... स्थळ लातुरातील कस्तुराई मंगल कार्यालय... व्यासपीठावर लातूरचे पालकमंत्री, आमदार, खासदार, पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी जी श्रीकांत बसले होते. शहरातील अनेक गणेश मंडळांचे पदाधिकारीही यावेळी हजर होते. साहजिकच दरवर्षीप्रमाणे यंदाही या गणेशमंडळांनी एकच मागणी जोर लावून धरली होती. रात्री दहाची वेळ बारापर्यंत वाढवून द्या आणि डॉल्बीची परवानगी द्या.

यावर अनेक मान्यवरांनी मतं मांडली. लातूरचे पोलिस अधीक्षक राजेंद्र मानेंनी डॉल्बीला मान्यता देणार नाही म्हणजे त्रिवार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. पोलिस अधीक्षकांच्या भूमिकेमुळे नाराज झालेल्या पदाधिकाऱ्यांना आशा होती जिल्हाधिकाऱ्यांकडून... जी श्रीकांत यांनी भाषणाला सुरुवात केली.

'तुम्हाला गणेशोत्सवात डीजे लावायचा आहे, बिनधास्त लावा...' जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे बोल ऐकून सभागृहात उपस्थित असलेल्या गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. टाळ्यांचा हा आवाज थांबताच जिल्हाधिकारी पुढे बोलू लागले...  'तुम्हाला डिजेची परवानगी देतो. त्यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या पत्राचीसुद्धा गरज नाही. केवळ तुम्ही तुमच्या आई किंवा बहिणीचं एनओसी सोबत आणा.'

जिल्हाधिकाऱ्यांनी या विधानातून ध्वनिप्रदूषणाच्या गांभीर्याकडे लक्ष वेधून घेतलं. पण या विधानामुळे सभागृहात टाळ्यांऐवजी नीरव शांतता पसरली. आपल्या घर आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी, ध्वनिप्रदूषण करु नये, यासाठी स्वतःच प्रयत्न करावा, घराच्यांनी परवानगी दिली तर मगच डॉल्बी लावा, या आवाहनातून जिल्हाधिकाऱ्यांनी मनं मात्र जिंकून घेतली.