बीड : पैशाचा पाऊस पाडून लाखो रुपये देतो,  20 हजार रुपये द्या, असं खोटं आश्वासन देत फसवणूक करणाऱ्या टोळीचा बीड दरोडा प्रतिबंधक पथकाने पर्दाफाश केला आहे. बीडच्या समनापूर परिसरातील गोरे वस्तीवर ही कारवाई करण्यात आली. अटक केलेले सर्व आरोपी पुणे, अहमदनगर, औरंगाबादमधील रहिवाशी असल्याचे समोर आलं आहे.


भाऊसाहेब गोपाळ गिरी, भगवान मेसू माने, बाबासाहेब पोपट भोंडवे, राहुल संजय वाळके, देवेंद्र भाऊदास वैष्णव अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. पाचही आरोपी गुरुवारी सायंकाळी समनापूर येथील गोरे वस्तीवर आले होते. याठिकाणी राजाभाऊ गोरे यांच्या घरी रात्रीच्या सुमारास जादूटोणा करण्याच्या उद्देशाने त्यांचे सर्व नियोजन झाले होते.


पैशाचा पाऊस पाडून देतो म्हणून सर्व जण हळद, कुंकू, लिंबू घेऊन पूजेसाठी बसले. या प्रकाराची माहिती बीड पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ सापळा सचून या टोळीचा भांडाफोड केला.


या सर्वांना बेड्या ठोकून बीड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. सर्व आरोपींवर महाराष्ट्र जादूटोणा अधिनियम 2013च्या कलम 2 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


संबंधित बातम्या 


गुप्तधनासाठी चिमुकल्या युगचा बळी, दोन तांत्रिकांना बेड्या