लातूर जिल्ह्यातील भिसे वाघोली या गावात ही घटना घडली. भिसे वाघोलीतील ही अशाप्रकारची पहिलीच घटना नाही.
यापूर्वी जानेवारी 2016 मध्ये याच गावातील मोहिनी भिसे या मुलीनेही याच कारणाने गळफास घेतला होता.
प्रत्येक जण हुंडा का मागतो असा सवाल करत मोहिनीने जीवनयात्रा संपवली होती.
मोहिनीच्या आत्महत्येनंतर खडबडून जागे झालेल्या भिसे वाघोलीच्या गावकऱ्यांनी हुंडा न घेण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र तरीही वर्षभरातच त्याच गावच्या मुलीला, त्याच कारणासाठी विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवण्याची वेळ आली.
आधी मोहिनी, आता शीतल
शीतल वायाळने शुक्रवारी विहिरीत उडी घेऊन आयुष्य संपवलं. सततची नापिकी, हालाखीची आर्थिक परिस्थिती आणि लग्नासाठी कर्ज मिळत नसल्यामुळे कंटाळून तीने सकाळी 8 वाजता विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. शीतलने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी हृदय पिळवटून टाकणारी आहे.
आत्महत्येपूर्वी शीतलने लिहिलेली चिठ्ठी
"मी शीतल व्यंकट वायाळ,
अशी चिठ्ठी लिहिते की माझे वडिल मराठा कुणबी समाजात जन्मले आहेत.
शेतात सलग पाच वर्षे नापिकीमुळे आमच्या कुटुंबाची परिस्थीत अत्यंत नाजूक आणि हालाखीची झाली आहे.
माझ्या दोन बहिणींची लग्न छोटेखानी पद्धतीने करण्यात आली.
पण माझं लग्न करण्यासाठी दोन वर्षांपासून बापाची दरिद्री संपत नव्हती.
कुठल्याही बँकेचं किंवा सावकाराचं कर्ज माझ्या बापाला न मिळाल्याने दोन वर्षांपासून माझं लग्न खोळंबलं होतं.
त्यामुळे मी माझ्या बापावरील वजन कमी करण्यासाठी आणि मराठा समाजातील रुढी,
परंपरा, देवाणघेवाण कमी करण्यासाठी स्वखुशीने आत्महत्या करत आहे.
मला व माझ्या कुटुंबाला समाजाने कुठलाही दोष देऊ नये.”शीतल वायाळ
भिसेवाघोली इथं व्यंकट वायाळ यांची जवळपास पाच एकर जमीन आहे. पत्नी, दोन मुले व तीन मुली असा त्यांचा परिवार. गेल्या पाच वर्षांपासून लातूर जिल्ह्यात दुष्काळाने घर केले. भिसेवाघोली हे दुष्काळात होरपळणारे गाव.
व्यंकट वायाळ यांच्या 5 एकरांपैकी दीड एकरात ऊस केलेला. पाण्याअभावी ऊस वाळून चाललेला. व्यंकट वायाळ यांनी आपल्या तीन मुलींपैकी दोन मुलींचे विवाह गेटकेन पद्धतीने (कुंकवातच) उरकले. तरीही या विवाहासाठी त्यांच्यावर कर्जाचा बोजा वाढत गेला.
सरकारी बँक, जिल्हा बँक यांसह पतसंस्था आणि खासगी उसनवारीचा कर्जबोजा अंगावर असल्याने तिसरी मुलगी शीतल (21) हिचा विवाह दोन वर्षांपासून थांबला होता. या विवाहासाठी त्यांना बँकांचे कर्जही मिळत नव्हते व पैशाचीही तडजोड होत नव्हती.
शीतलचे दहावीचे शिक्षण झाल्यानंतर वडिलांनी तिचे पुढील शिक्षण थांबविले. शीतल आईसोबतच घरकाम आणि शेतकाम करत असे. सध्या उन्हाचे दिवस असल्याने शीतल व तिची आई सकाळी ७ वाजताच शेतातील ऊस खुरपण्यासाठी गेल्या होत्या. आठच्या सुमारास शीतल पिण्यासाठी पाणी घेऊन येते, म्हणून आईला सांगून गेली.
बराच वेळ होऊनही शीतल कशी आली नाही, म्हणून तिच्या आईने शोधाशोध केली. दुसर्या बाजूला शीतलचे वडीलही काम करत होते.त्यांनाही हाक दिली. शेताचे शेजारी दिलीप पाटील यांनाही हाक दिली. दिलीप पाटील यांनी शोध घेत विहिरीत डोकावले असता पायातील चप्पल पाण्यावर तरंगत असल्याचे दिसल्याने आरडाओरडा सुरू झाला. ही घटना गावात समजली. गावकर्यांनी मुरुड पोलिसांना कळविले. विहिरीवरील मोटारीत बिघाड असल्याने विहिरीत साधारण परसभर पाणी होते.
आजूबाजूचे दोन पंप बसवून व महावितरणला सांगून भारनियमनात वीजपुरवठा सुरु करून विहिरीतील पाणी उपसल्यानंतर मृतदेह काढण्यात आला.
वर्षभरापूर्वी मोहिनी भिसेचीही आत्महत्या
वर्षभरापूर्वी मोहिनी पांडुरंग भिसे या शेतकरी कन्येने याच गावात आपली जीवनयात्रा संपविली होती. कर्जबाजारी शेतकर्यांच्या हलाखीची जाणीव आणि त्यामुळे वडिलांची होणारी ओढाताण सहन न झाल्याने मोहिनी भिसेने आत्महत्या केली होती.
भिसेवाघोली गाव त्यावेळी राज्यात चर्चेत आले. गावात त्यानंतर ना हुंडा देवू ना घेवू असा गावान ग्रामसभा घेवून ठराव केला होता.परंतु त्या ठरावाची अंमलबजावणी झाली नाही.
मोहिनी भिसेची आत्महत्येपूर्वीची चिट्ठी
प्रिय मम्मी पप्पा..
पप्पा दारू पिऊ नका. मी कधीही असा विचार केला नव्हता की मला असे करावे लागेल.
कोणतेही स्थळ आले की पहिला प्रश्न हुंडा किती देणार ? मी हे आनंदाने करत आहे.
आता तुमचे पैसे लागणार नाहीत. ते मी वाचवले. पपा कोणीही हुंडा का मागतो ? ही प्रथा मोडली पाहिजे.
मुलीच्या बापानेच का झुकायचे ? यासाठी मी आत्महत्या करत आहे.
मी गेल्यावर तुम्ही दिवसाचे मासिक आणि वर्षश्राध्द घालू नका.
माझ्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी करतात. माझी शांती यातच आहे. तुम्ही मात्र काही करू नका. ममीला सांगा निळूला काम लावू नको. तुम्ही रडू नका. स्वत:ची काळजी घ्या…
…… तुमची मोहिनी