मुंबई: शिवसेनेचे उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड एअर इंडिया प्रकरणानंतर चांगलेच चर्चेत आलेत. त्यामुळे लोकांचा सततचा ससेमिरा टाळण्यासाठी गायकवाडांनी नवी युक्ती लढवली आहे.


गायकवाड सध्या चक्क आपल्या डुप्लिकेटसोबत सर्वत्र फिरताना दिसतात. रवींद्र गायकवाडांचा डुप्लिकेट असणारा रत्नाकांत सागर सध्या खरा रवींद्र गायकवाड बनून फिरत आहे. दै. मिररने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

गायकवाडांसारखाच तो कुर्ता-पायजमा घालून फिरतो. तर स्वत: गायकवाड टी-शर्ट आणि जीन्स अशा कॅज्युअल पेहरावात फिरतात.

एअर इंडियाप्रकरणामुळे प्रकाशझोतात आलेल्या गायकवाडांसोबत अनेक जण सेल्फी काढण्याचा आग्रह धरतात. यामुळे रत्नाकांत सागरच अनेकांसोबत गायकवाड बनून सेल्फी काढतो.

स्वत: गायकवाड त्याची ओळख साहेब अशी करुन देतात आणि स्वत:ला साहेबांचा सेक्रेटरी असल्याचं अनेकांना सांगतात.

एअर इंडिया कर्मचाऱ्याला मारहाण

रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चप्पलने मारहाण केल्यामुळे ते देशभरात चर्चेत आले होते. पुणे-दिल्ली विमानप्रवासादरम्यान, तिकिटावरुन वाद झाला होता.

बिझनेस क्लासचं तिकीट असताना आपल्याला इकॉनॉमिक क्लासमध्ये बसायला सांगितलं, असा दावा गायकवाड यांनी केला होता. त्यावरुन वाद झाला होता.

या वादामुळे आधी एअर इंडियाने रवींद्र गायकवाड यांच्यावर बंदी घातली. मग त्यानंतर सर्वच विमान कंपन्यांनी  बंदी घातली होती. हा मुद्दा लोकसभेतही गाजला होता.

अखेर एअर इंडियाने खा. रवींद्र गायकवाडांवरील बंदी हटवली!

जवळपास दोन आठवड्यांनी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावरील विमानबंदी हटवण्यात आली. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर एअर इंडियाने आपला निर्णय मागे घेतला. मात्र गायकवाड यांनी माफी माघावी अशी भूमिका एअर इंडियाने घेतली होती. पण मी संसदेची माफी मागेन, एअर इंडियाची नाही असं रवींद्र गायकवाड यांनी काल म्हटलं होतं.

संबंधित बातम्या

अखेर खासदार रवींद्र गायकवाड उद्धव ठाकरेंना भेटले!

अखेर एअर इंडियाने खा. रवींद्र गायकवाडांवरील बंदी हटवली!