(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lata Mangeshkar passed away : एका सुवर्णयुगाचा अंत; रसिकांना मंत्रमुग्ध करणारे दैवी स्वर हरपले : बाळासाहेब थोरात
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. आठ दशकांहून अधिक काळ रसिकांना मंत्रमुग्ध करणारे दैवी स्वर हरपले असल्याची प्रतिक्रिया
Lata Mangeshkar passed away : गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. आठ दशकांहून अधिक काळ रसिकांना मंत्रमुग्ध करणारे दैवी स्वर हरपले असून, संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुग संपले आहे. असे ट्वीट करत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. आम्ही सर्व मंगेशकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असल्याचे थोरात म्हणाले. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त सुन्न करणारे आहे. आपल्या सुमधुर आवाजाने त्यांनी संपूर्ण जगातील रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक स्वर्णिम पर्व संपले आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे.
आपल्या स्वर्गीय स्वरांनी भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध करणाऱ्या गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त सुन्न करणारे आहे. लतादीदींच्या आवाजात जादू होती, असा आवाज शतकात एखाद्यालाच लाभतो. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी पहिले गाणे गायले होते. आपल्या 78 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत लतादीदींनी हिंदी, मराठीसह 20 भाषांमधील 25 हजारांहून अधिक गितांना आवाज दिला. आनंदघन नावाने त्यांनी अनेक चित्रपटांना संगीतही दिले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न पुरस्कारासह जगभरातील अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. लतादीदी ह्या फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाच्या भूषण होत्या. त्यांच्या निधनाने संगीत आणि सांस्कृतीक क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून त्या चिरकाल स्मरणात राहतील. लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.
वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवाराली लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात गेल्या 28 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. त्यांच्या निधनावर विविध क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.
लतादीदींच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे. मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या निधनानं आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे, जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या त्याचं भारतीय संस्कृतीतील एक मोठं नाव म्हणून स्मरण ठेवतील, लतादीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी लतादीदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: