शहापूर: ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील किन्हवली पोलीस ठाण्यातील काही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आदिवासी महिलांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज भाजपच्या वतीनं पोलीस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे.


ग्रामपंचायत निवडणूक काळात झालेल्या वादानंतर शहापुर कोर्टात जामीन देण्यासाठी किन्हवली पोलीस ठाण्यात हजर झालेल्या आदीवासी महिला येथीलच काही महिला पोलिसांकडुन झालेल्या  मारहाणी प्रकरणी शहापूर भाजपच्या वतीने गुरुवारी रात्री 9 वाजेपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे.

सदर महिला पोलीसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. शहापूर तालुक्यातील कानडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणुक 25 जुलैला पार पडली यावेळी भाजप व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद उफाळून आला आणि त्याचे पर्यावसन हाणामारीत झाली.

याप्रकरणी किन्हवली पोलीस ठाण्यात 54 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, गुरुवारी 15 महिलांना शहापूर कोर्टात जामीन दयावयाचा असल्याने या महिला किन्हवली पोलीस ठाण्यात हजर झाल्या होत्या. यावेळी त्यांना मारहाण केल्याचा भाजपच्या वतीनं आरोप करण्यात आला आहे.