मुंबई : मुंबईतील कापड बाजारात काम करणाऱ्या गुमास्ता कामगारांनी आज आणि उद्या पगारवाढ आणि इतर मागण्यांसाठी बंद पुकारला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईतल्या कापड बाजारातली उलाढाल दोन दिवस थंडावणार आहे.

या संपामुळे मुंबईतील मंगलदास मार्केट, काकड मार्केट, जुनी हनुमान गल्ली या कापड बाजारातील वीस ते पंचवीस हजार कामगार या संपात सहभागी होणार आहे. "मुंबईतील पाचही कापड बाजारांत सुमारे २० हजारांहून जास्त गुमास्ता कामगार काम करतात. मागच्या वर्षीही २० ऑक्टोबरला एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला होता," अशी माहिती मुंबई गुमास्ता युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पगारवाढीबरोबरच आरोग्य विम्याचं कवचही मिळायला हवं, अशी मागणी कामगारांच्या संघटनेने केली आहे. मागणीकडे दुर्लक्ष केल्यास बेमुदत संपाचा इशाराही गुमास्ता कामगार संघटनेनं दिला आहे.