Wardha Crime News वर्धा : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुचाकीची चोरी होत असल्या घटना घडत होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांकडे होत असलेल्या चोरीच्या तक्रारीमध्ये देखील वाढ झाली होती. परिणामी, पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी सर्व पोलीस ठाणेदारांना दुचाकी चोरांना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. अशातच आर्वी पोलिसांनी एका दुचाकी चोरीचा (Crime) तपास करत दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे. तर दोन विधिसंघर्षित बालकांना ही ताब्यात घेतले आहे. हे सर्व दुचाकी चोर वर्धा (Wardha) जिल्ह्यातून दुचाकी चोरून वाशिम जिल्ह्यात विक्री करत होते. या टोळीचा पर्दाफाश केल्याने शहरात समाधान व्यक्त करण्यात येत असून आता तरी दुचाकी चोरीवर अंकुश बसणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चोरीच्या तब्बल 23 दुचाकीसह अखेर 'त्या' टोळीचा पर्दाफाश
आर्वी पोलीस स्टेशन हद्दीतील दोन दुचाकी चोरीच्या घटनेचा तपास आर्वी पोलिसांकडून सुरु होता. अशातच धानोडी येथे चोरीची दुचाकी विक्रीकरिता एक युवक येत असल्याची माहिती आर्वी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकला मिळाली. यावरून पोलिसांनी सपाळा रचत नयन मिलिंद गायकवाड (वय 19 वर्ष रा. कोसूर्ला) याला दुचाकीसह अटक केलीय. संशयित आरोपीला अटक करत तपास केला असता संशयित आरोपीने वर्धा जिल्ह्याच्या आर्वी, सेवाग्राम, सावंगी, अल्लीपूर, खरागणा, सेलू येथील दुचाकी चोरल्याची कबुली दिलीय. दुचाकी चोरताना संशयित आरोपी नयन सोबत वर्ध्याच्या येसंबा येथील साहिल डोंगरे आणि दोन विधीसंघर्षित बालक मदत करत होते. हे सर्व दुचाकी चोरून वाशिम येथे जाऊन विक्री करत असल्याच समोर आलंय.
एका गावातून चोरी, तर दुसऱ्या गावात विक्री
या प्रकरणातील संशयित आरोपी हे दुचाकी चोरून वाशिम येथे सय्यद सलमान सय्यद साबीर आणि मोहम्मद फैजल मोहम्मद फिरोज याला विक्री करत होते. पोलिसांनी या संशयित आरोपीना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी सत्य संगीतेले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. आर्वी पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत एकूण 23 दुचाकी जप्त केल्या आहे. या प्रकरणात आणखी गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरूल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी देवराव खडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, रामकिसन कासदेकर, दिगंबर रुईकर, अमर हजारें, प्रवीण सदावर्ते, राहुल देशमुख, निलेश करडे, स्वप्नील निकुरे यांनी केलीय.
पोलिसांनी पकडलेले हे दुचाकी चोरटे ज्या वाहनाना हॅण्डल लॉक नव्हते यांना पहिले टार्गेट करत होते. तर काही ठिकाणी यांनी हॅण्डल लॉक तोडून वाहने चोरून नेलीय. दुचाकी चोरताना यांनी महागड्या दुचाकी सुद्धा चोरल्या आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आर्वी पोलिसांनी केलेल्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करत त्यांना बक्षीस जाहीर केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या