सागंली : सातारा, सांगली आणि सोलापूर या तीन जिल्ह्यातील सात तालुक्यातील 210 गावातील लाभ क्षेत्राला पाणी देण्यासाठी टेंभू योजनेचा जन्म झाला. टेंभू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार म्हणून ओळख असलेले कै. आमदार संपतराव देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे 1996 रोजी या योजनेला मान्यता मिळाल्यानंतर या योजनेचे काम सुरू झाले. कृष्णा नदीवर कराडजवळील टेंभू गावात मोठा बराज बांधून पाणी अडवणे आणि तिथून ते पाणी उचलून कित्येक किलोमीटरपर्यंत जाणार असे तंत्रज्ञान उभारले जाणार होते. त्यामुळे या योजनेला विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगातील अफाट नमुना म्हणून गणले जाते. दुसरीकडे आशिया खंडातील सर्वात मोठी योजना म्हणून देखील या योजनेकडे पाहिले जाते. या योजनेमुळे कित्येक किलोमीटरचे अंतर पार करून सांगली जिल्ह्यातील खानापूर-आटपाडी तालुक्यात कृष्णा नदीचे पाणी अवतरले आहे. खानापूर तालुक्यातील योजनेचे 5 टप्पे पूर्ण झालेत तर तिकडे आटपाडी तालुक्यातील 40 हून अधिक गावात कृष्णेचे पाणी पोहोचले आहे. यामुळे या भागातील शिवार, माळरान, फळपिके, भाजीपाला आणि इतर पिकांनि हिरवीगार होत आहेत.
कराडपासून कॅनॉल तर कधी बंदिस्त पाईपमधून असा कित्येक किलोमीटरचा प्रवास करत कृष्णा नदीचे हे पाणी अवतरलय जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण असलेल्या खानापूर घाटमाथ्यावरील पळशी गावात. हा टेंभू योजनेचा तसा पाचवा टप्पा जो कृष्णामाई आल्याने पूर्णही झालाय आणि यशस्वीही झालाय. एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या खानापूर, आटपाडी भागात कृष्णामाई अवतरेल असे येथील लोकांना स्वप्नांतही वाटत नव्हतं. पण टेंभू योजनेच्या माध्यमातून हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आणि साकारले देखील. तसे जिल्ह्यात 6 टप्प्यातही टेंभू योजना विभागलीय. चार टप्प्याचे काम पूर्ण झाल्याने काही भागात पाणी पोहोचले होते. मात्र पाचव्या टप्प्याचे काम करणे हे मोठे आव्हान होते. कारण ज्या गावाना टेंभु योजनेच्या पाचव्या टप्प्याच्या माध्यमातून पाणी येणार होते ती गावे खूप उंचावर होतं. त्यामुळे डोंगरात आणि उंचावर असलेल्या गावापर्यंत या योजनेचे पाणी पोहोचवणे हे मोठे दिव्य होते. या भागातील लोकांना तर कृष्णेचे पाणी इतक्या उंचीवर असलेल्या गावात हे दिवास्वप्नच वाटत होते.
टेंभू योजनेतील पाचव्या टप्यातील सर्वाधिक उंचीवर असलेले पळशी हे गाव होते. पण इतक्या दूरवर आणि उंचीवर पाणी आलेय. पाण्याचं प्रेशर देखील जास्त आहे. खऱ्या अर्थाने तांत्रिकदृष्ट्या देखील ही योजना यशस्वी झालीय. महाराष्ट्रमध्ये अन्य उपसा सिंचन योजनेपेक्षा टेंभू ही कार्यक्षमतेने चालते, हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. या योजनेतील सर्वात उंचीच्या गावात कृष्णा नदीचे पाणी आल्याने या गावची कृष्णेच्या पाण्याची प्रतीक्षा संपली आहे. आता या गावातील 100 टक्के जमिन बागायतीखाली येईल, फळबागा जास्त होतील आणि गावात परदेशी पैसे येतील, असा विश्वास आहे.
मागील 10 वर्षांपासून पळशी गावातील नागरिकांना कृष्णेच्या पाण्याची प्रतीक्षा होती. पण मागील काही वर्षात पुन्हा प्रयत्न सुरू झाले. आज गावात कृष्णामाई गावात अवतरलीय याचा मोठा आनंद आहे. पळशी गाव दुर्गम भागातील गाव आहे. या गावात कृष्णेचे पाणी आल्यानं आता हा भाग आणखी विकसित होईल. शेती आणखी वाढेल आणि अधिक विकास होईल. जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांना येणाऱ्या महापुराचे पाणी कर्नाटकात वाहून जाते. 2019 च्या महापुरानंतर वाहून जाणारे पाणी उचलून दुष्काळी भागाला गतवर्षी दिले. यंदा 101 टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर्षी संभाव्य पुराची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदाही पुराचे वाहून 2 टीएमसी पाणी सिंचन योजनेतून दुष्काळी भागातील तलाव भरण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून केले जात आहे. सद्यस्थितीत दुष्काळी भागातही पाणीसाठा असल्याने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाणी उचलले जाणार आहे. मागील काही वर्षापासून धरण
पाणलोट क्षेत्रात दमदार अतिवृष्टी होत आहे. कोयना आणि चांदोली धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला की धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु होतो. याचवेळी दुष्काळी भागात मात्र पाण्याची प्रचंड टंचाई निर्माण झालेली असल्याचे यापूर्वी पहायला मिळाले. पाण्याअभावी दुष्काळी भागातील पिके वाया जाण्याचा धोका निर्माण होतो. दरवर्षी शंभर टीएमसी पेक्षा जास्त पाणी वाहून जाते. पुराचे वाहून जाणारे पाणी सिंचन योजनांच्या माध्यमातून दुष्काळी भागात सोडून बंधारे, तलाव भरण्यात येणार आहे.
मागील वर्षी कृष्णा नदीतून दुष्काळी भागाला पाणी देण्यात आले होते, मात्र काही पंप पाण्याखाली गेले. यावेळी मात्र आधीच दक्षता घेत पूर्ण क्षमतेने कृष्णा नदीतील पाणी उचलून ते टेंभू योजनेच्या माध्यमातून दुष्काळ भागाला देण्याचा आमचा पुरेपूर प्रयत्न आहे. तसं दुष्काळी भागात कृष्णा नदीच पाणी पोचवणे हे दिवास्वप्न वाटत होतं. मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उत्तम नमुना असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंभू योजनेच्या माध्यमातून सर्वात उंचीच्या गावात कृष्णा नदीच पाणी पोचल्याने हे स्वप्नही आज साकारलंय.