पंढरपूर : यंदा आषाढी यात्रा पायी होणार की बसने याचा घोळ केव्हाही सुटो मात्र पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या महाराज आणि वारकऱ्यांचे लसीकरण करूनच त्यांना पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा अशी मागणी पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांनी केली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फार मोठा फटका पंढरपूर परिसराला बसल्याने यंदा गेल्यावर्षी प्रमाणे प्रातिनिधिक स्वरूपातच वारी करण्याची भूमिका पंढरपूर मधील नागरिकांची आहे.
संतांच्या मानाच्या सातही पालखी सोहळे थांबत असलेले मठ हे प्रदक्षिणा मार्गावर असून शहराची सर्वात जास्त लोकसंख्या प्रदक्षिणा मार्गाच्या आतल्या बाजूस आहे. यामुळे येणारे वारकरी लसीकरण करून आले तर नागरिकांना धोका कमी वाटेल अशी भूमिका नगराध्यक्ष साधना भोसले यांनी व्यक्त केली. अशाच पद्धतीची भूमिका प्रदक्षिणा मार्गावरील कुटुंबांनी देखील मांडली आहे.
अजूनही पंढरपूरमध्ये कोरोना आणि म्युकरमायकोसिसचे रोज नवनवीन रुग्ण सापडत आहेत. आत्तापर्यंत पंढरपूरमध्ये 24731 कोरोनाचे रुग्ण सापडले असून सध्या 555 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे अधिकृत सरकारी आकड्यानुसार आतापर्यंत 480 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 419 रुग्ण सापडले असून यात 35 जणांचा मृत्यू झाला असल्याने नागरिकांत अजूनही कोरोनाची दहशत कायम आहे.
सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे वेदांत आणि व्हिडीओकॉन या भक्त निवासाला कोविड केअर सेंटर केले आहे. तर मंदिराजवळील संत गजानन महाराज मठही शहरातील कोविड रुग्णांसाठी ठेवण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या निवासासाठी बनविलेले 65 एकरावरील भक्ती सागर हा निवासतळही कोविड हॉस्पिटल आणि कोविड केअर सेंटरसाठी वापरलं जात आहे . अशावेळी पालखी सोहळ्यासोबत येणारे वारकरी यंदा दशमी ते द्वादशी असा 6 दिवस मुक्काम करणार असल्याने नागरिकांची भीती वाढली आहे.
गेल्यावर्षी दशमीला आलेल्या पालख्या द्वादशीला परत फिरल्या होत्या. यंदा मात्र वारकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने दोन दिवसाचा मुक्काम परंपरेप्रमाणे पौर्णिमेपर्यंत वाढवला आहे. आषाढी सोहळा हा पंढरपुरातील नागरिकांना दिवाळीपेक्षा मोठा असला तरी यंदाची परिस्थिती गेल्यावेळीपेक्षा भीषण असल्याने वारीचे नियोजन करताना पंढरपूरच्या नागरिकांचाही विचार करावा अशी मागणी नगराध्यक्षांनी केली आहे.