मुंबई: एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर पक्षात राजकीय इनकमिंग सूरुच आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जनसुराज्य पक्षाचे नेते आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजीव आवळे यांनी बुधवार (16 डिसेंबर) रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
राजीव आवळेंचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पार पडला. माजी आमदार राजीव आवळे यांच्यासोबत इचलकरंजी नगरपरिषदेचे नगरसेवक अब्राहम आवळे, वडगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी, वडगाव नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा लता सूर्यवंशी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
राजीव आवळेंच्या पक्ष प्रवेशाने हातकणंगले तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष मजबुत होणार आहे. तालुक्यात त्यांचा प्रचंड जनसंपर्क असल्याने त्याचा फायदा राष्ट्रवादी कॉंग्रेसला होणार आहे. या आधी तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाला कोणताही नेता नसल्याने कार्यकर्ते मोठ्या संख्येनं असूनही पक्ष नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. ती आता राजीव आवळेंच्या प्रवेशाने भरुन निघाली आहे. तसेच इचलकरंजी नगरपालिकेत त्यांचा वेगळा गट आहे. त्यामुळे इचलकरंजी नगरपालिकेमध्येही राष्ट्रवादीला फायदा होणार असल्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादी अधिक भक्कम
राजीव आवळे यांच्यासोबत पक्षप्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आपण आगीतून फुफाट्यात आलो असा विचार कधीच करु नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच राजीव आवळेंना विकास कामात आपण लागेल ती मदत करु असंही आश्वासन त्यांनी दिलं. कोल्हापूरातील राष्ट्रवादी पक्ष भक्कम होत असताना राजीव आवळेंसारखा दांडगा जनसंपर्क असलेला नेता पक्षात येतोय याचा आनंद होत असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, "राजीव आवळे यांचा दांडगा संपर्क लक्षात घेता पक्षाला त्यांची चांगली मदत होणार आहे. जे आज पक्षात प्रवेश करत आहेत त्यांची विविध विकासकामे करण्यासाठी मदत करु."
कोण आहेत राजीव आवळे?
इचलकरंजी नगरपालिकेचे सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून राजीव आवळेंची ओळख आहे. त्यांनी 2004 साली तत्कालीन वडगाव विधानसभेची निवडणूक लढवली आणि माजी मंत्री जयवंत आवळेंचा पराभव केला. आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत त्यांनी हातकणंगले तालुक्यात प्रचंड जनसंपर्क वाढवला. 2009 सालच्या मिरज दंगलीनं कोल्हापूरचं राजकारण बदललं. त्याचा फटका जिल्ह्यातील भल्या-भल्यांना बसला. राजीव आवळेंचा त्यात समावेश होता.
राजीव आवळे यांच्या पत्नी सौ. स्मिता आवळे या कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. त्याही राजकारणात सक्रिय आहेत. आवळेंचे बंधू अब्राहम आवळे हे इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक आहेत. राजीव आवळे यांचं 'बहुजन रयत परिषदे' च्या माध्यमातून बहुजन, दलित विशेषत: मातंग समाजात मोठं काम आहे.
महाराष्ट्रभर राष्ट्रवादी पक्ष वाढवणं, त्यातल्या त्यात दलित, उपेक्षीत, मातंग समाजात पक्षाचा विचार पोहचवणं या गोष्टीला प्राथमिकता देणार असल्याचं राजीव आवळेंनी स्पष्ट केलंय. ते म्हणाले की, "पवार साहेबांनी कायमच दलितांना आणि उपेक्षीतांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. आता त्यांचे विचार तळागाळात पोहचवणे आणि उपेक्षीतांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करणार आहे. सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरु आहे. अशा वेळी संविधान वाचवण्यासाठी पवार साहेबांना बळ देणं आवश्यक आहे."
महत्वाच्या बातम्या: