Kolhapur Police: कोल्हापूर दोन दिवस दंगलीत होरपळत असतानाही पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवराज्याभिषेक दिनी कोल्हापुरात धार्मिक दंगल होऊनही रात्रीपर्यंत पोलीस रात्री उशिरापर्यंत नाकाबंदीच्या आदेशाची पाहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने याबाबत 'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी दैनिकाने वृत्त दिले आहे.
कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी दंगल सदृश्य परिस्थिती होऊन प्रार्थनास्थळांवर दगडफेक करण्यात आली होती. तब्बल तीन ते चार तास शहरात थरकाप उडाला होता. तसेच बुधवारी 7 जून रोजी हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची घोषणा करण्यात आली होती. बंदी आदेशानंतरही बंदवर हिंदुत्ववादी संघटना ठाम राहिल्या होत्या. अशी भयंकर स्थिती असतानाही रात्री उशिरापर्यंत कोल्हापूर पोलिसांना नाकाबंदीचे आदेश देण्यात आले नव्हते. सात आक्षेपार्ह स्टेट्स दिसून आल्यानंतर कोल्हापुरात धार्मिक तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे संभाव्य परिस्थिती लक्षाlत घेत नाकाबंदी करण्यासाठी कोणताही आदेश रात्रीपर्यंत आला नव्हता, अशी माहिती पोलीस सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.
दुसऱ्या दिवशी हिंदुत्ववादी मोर्चाला लागलेल्या हिंसक वळणाने कोल्हापूर शहरात उग्र रुप धारण केले होते. तब्बल तीन तास हुल्लडबाज आणि पोलिसांचा संघर्ष सुरु होता. हुल्लडबाजांनी विशिष्ट भागांना टार्गेट करत दगडफेक केली होती. तसेच रिक्षा आणि दुकानांचे नुकसान केले होते. जमावाला नियंत्रित करण्यासाठी कोणताही आदेश देण्यात आले नाहीत, त्यांच्याकडे (अधिकार्यांकडे) ऑर्डर दाखवून द्या, जर असेल तर, अशी प्रतिक्रिया एका पोलिस अधिकाऱ्याने दिल्याचे 'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तात म्हटले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापुरात बंदची हाक देण्यात आली होती.
सोशल मीडियातून मेसेज व्हायरल करून शिवाजी चौकात जमण्याचे आवाहन करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. बुधवारी सकाळी साडे आठ वाजल्यापासून जमाव जमण्यास सुरुवात झाली होती. अवघ्या दोन तासांमध्ये याठिकाणी हजारोंचा जमाव जमला होता. शिवाजी चौकात ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागून विशिष्ट भागात दगडफेक करण्यात आली. यावेळी वाहनांची सुद्धा तोडफोड करण्यात आली. यावेळी कोल्हापूर पोलिसांना उचित कारवाई न केल्याचा आरोप होत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओंमध्ये बजरंग दलाचे बंडा साळोखे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आल्याचे दिसून येत होते. त्याठिकाणी उपस्थित असलेला दुसरा मोठा गट सांगलीमधील संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानचा होता. मिरज आणि भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या वेळी भिडे यांचे नाव पुढे आले होते. पोलिसांनी वेळीच कारवाई न केल्याने सडकून टीका होत आहे. छत्रपती शाहू महराज यांनीही खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मी स्वत: जिल्हाधिकारी, एसपी आणि आयजी यांना फोन करून मला जमलेल्या लोकांशी बोलण्याची परवानगी द्यावी जेणेकरून ते शांत होतील. पण मी त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कदाचित त्यांना माझी मदत गरज वाटली नसेल. दुसरीकडे, पोलिसांनी आतापर्यंत 36 जणांना अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या