कोल्हापूर : देवदासी प्रथेविरोधात संपूर्ण आयुष्य वाहिलेले आणि बेरड रामोशी समाजाच्या उद्धाराचा ध्यास घेतलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक डॉ. भीमराव गस्ती यांचं आज (मंगळवार) पहाटे निधन झालं. कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ते 67 वर्षांचे होते.

डॉ. गस्ती हे मूळचे बेळगावमधील यमनापूर येथील होते. तिथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंधश्रद्धा आणि रुढी-परंपरांनी जखडलेल्या बेडर समाजात जन्मलेल्या डॉ. गस्ती यांनी गावच्या शाळेतच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतलं. पुढे एम. एस्सी. इलेक्ट्रॉनिक्स ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यावर रशियाची राजधानी मॉस्कोच्या पेट्रिक लुमुंबा विद्यापीठातून याच विषयात पीएचडी मिळवली. हैदराबाद येथील डीआरडीओमध्ये त्यांना ज्येष्ठ शास्त्रज्ञाची नोकरीही मिळाली होती.

देवदासी प्रथा नष्ट व्हावी आणि त्या महिलांचे पुनर्वसन करण्यासाठी भीमराव गस्ती यांनी कर्नाटक, महाराष्ट्रासह अनेक राज्यात आंदोलने केली. त्यांच्या आंदोलनामुळे आणि पाठपुराव्यामुळे सरकारला देखील देवदासी प्रथे विरोधात दखल घ्यावी लागली. बेडर रामोशी समाजात साक्षरतेचे महत्व पटवून देऊन त्या समाजातील मुलांनी शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात गस्ती यांचे योगदान मोठे होते.

केवळ देवदासी प्रथेचे निर्मूलन करून गस्ती स्वस्थ बसले नाहीत तर अनेक राज्यात कार्यकर्त्यांचे जाळे विणून देवदासी महिलांच्या पुनर्वसनासाठी अनेक योजना राबवल्या. त्यामुळे देवदासी महिलांना समाजात स्वाभिमानाने जगण्यास बळ मिळाले हे गस्तींच्या कार्याचे मोठे यश म्हणावे लागेल.
बेळगाव जवळील यमनापूर गावात त्यांनी सुरु केलेली उत्थान संस्था म्हणजे अनेकांना मोठा आधार होता. देवदासी महिलांना प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी अनेक ठिकाणी केंद्रे गस्तींनी उघडली होती. या संस्थेमधून प्रशिक्षण घेतलेल्या अनेक देवदासी महिला आज स्वाभिमानाने जगत आहेत.

बेरड रामोशी समाजावर पोलिस खोटे खटले, गुन्हे दाखल करून त्यांना त्रास देत असत. त्या विरोधात गस्ती यांनी राज्य स्तरावर आवाज उठवून समाजात त्यांना मानाने जगता यावे यासाठी आंदोलने छेडून लढे दिले आणि त्यात ते यशस्वी झाले. यांनी देवदासी प्रथा नष्ट व्हावी यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले.

सामाजिक कार्य करत असतानाच त्यांनी जनजागृतीसाठी अनेक वृत्तपत्रे, नियतकालिके यामधून विपुल लेखन केले. बेरड ही त्यांची कादंबरी म्हणजे त्यांची आत्मकथाच आहे. बेरड या कादंबरीचे अनेक साहित्यिकांनी कौतुक केले. बेरड कादंबरीचे लेखन स्वानुभवावर आधारित असल्यामुळे वाचकांनी देखील त्या कादंबरीला दाद दिली. बेरड कादंबरीला अनेक पुरस्कारही लाभले. बेरड शिवाय आक्रोश आणि अन्य पुस्तकेही त्यांची प्रसिद्ध झाली आहेत.

कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि उत्तरेकडील राज्यातही गस्ती यांनी आपल्या कार्याचा विस्तार वाढवला होता. अनेक संस्थानी गस्ती याना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.अत्यंत साधी राहणी आणि कार्यकर्त्यांशी आपुलकीने संवाद साधण्याच्या त्यांच्या शैलीमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ते आपले वाटत असत.

ज्ञानप्रबोधिनी, स्वरूप वर्धिनी, समरसता मंच, रा स्व संघ, समरसता साहित्य परिषद, डॉ  हेडगेवार रुग्णालयाशी त्यांचे घनिष्ठ संबंध  होते

देवदासी प्रथा निर्मूलन करून त्या महिलांचे पुनर्वसन करण्याचा ध्यास भीमराव गस्ती यांनी घेतला होता. त्यांच्यामुळे देवदासी पद्धत बंद झाली. बेरड रामोशी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यात आणि त्यांना साक्षर करण्यात गस्तींनी आपले आयुष्य वाहिले अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार अशोक याळगी यांनी आपली आदरांजली वाहिली.

महानगरपालिकेत देखील डॉ.भीमराव गस्ती याना श्रद्धांजली वाहण्यात आली. गाणेशोत्सवाच्या पूर्वतयारीसाठी महानगरपालिकेत बैठक आयोजित  करण्यात आली होती. बैठकीच्या प्रारंभी महापौर संज्योत बांदेकर यांनी गस्ती यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला. यावेळी बैठकीच्या प्रारंभी लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी मौन पाळून गस्ती याना श्रद्धांजली अर्पण केली.