कोल्हापूर : कर्नाटकातील म्हैसूरमधील जगमोहन पॅलेसमध्ये 'ग्लो ऑफ होप' नावाचं जलरंगातील जगप्रसिद्ध चित्र आहे. या चित्रातली स्त्री तरुण दिसत असली, तरी नुकतंच तिने शंभरीत पदार्पण केलं आहे. कोल्हापुरातील 100 वर्षीय मॉडेल गीताताई उपळेकर यांची कहाणी आगळीवेगळी आहे.


कोल्हापुरातील 100 वर्षीय गीताताईंचे वडील सावळाराम हळदणकर त्या काळातील प्रसिद्ध चित्रकार होते. दिवाळीला नटून थटून हातामध्ये दिवा घेतलेली 13 वर्षीची मुलगी गीता घरातील आतल्या खोलीतून बाहेर येताना त्यांनी पहिली आणि दिवाळी झाल्यावर तुझं असंच चित्र काढू, असं ते त्याच वेळी म्हणाले.

दिवाळीनंतर लगेचच गीताला समोर ठेवून त्यांनी हे अजरामर चित्र रेखाटलं. या चित्राची जागा आज जगप्रसिद्ध ऐतिहासिक म्हैसूर पॅलेस मध्ये आहे. म्हैसूरचे राजे वडियार यांना चित्रकलेची विशेष आवड होती. 1932 साली तयार झालेलं हे ऐतिहासिक चित्र राजे जयचमा राजेंद्रा वडियार यांना आवडलं. त्यांनी हे चित्र त्याकाळी तीनशे रुपयांना विकत घेतलं.

त्यानंतर म्हैसूर पॅलेस मधील आर्ट गॅलरीत हे चित्र राजा रविवर्मांच्या चित्रांच्या पंगतीत बसवण्यात आलं. म्हैसूरच्या जगमोहन पॅलेसमधली आर्ट गॅलरी प्रसिद्ध आहे, ती राजा रविवर्मा यांच्या सोळा चित्रांसाठी. याच चित्रांच्या पंगतीतलं 'द लेडी वुइथ लॅम्प' अर्थात 'ग्लो ऑफ होप' हे चित्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. जगात जलरंगातील सर्वोत्कृष्ट तीन चित्रांमध्ये या चित्रानं स्थान मिळवलं आहे.

म्हैसूर पॅलेस मधील आर्ट गॅलरी मध्ये आजूबाजूला रामायण, महाभारत आणि मुघलकालीन राजा रविवर्मांची चित्रं असल्यामुळं 'ग्लो ऑफ होप' ही देखील त्यांचीच कलाकृती आहे, असा अनेकांचा समज होतो. पण हे चित्र सावळाराम हळदणकर यांच्या कुंचल्यातून साकारलं आहे.

या अजरामर कलाकृतीतील मॉडेल असलेल्या गीताताईंनी शंभरीत पदार्पण केलं आहे. तुम्हा-आम्हाला लाजवेल असा उत्साह, भारदस्त आवाज आणि कमालीची स्मरणशक्ती. त्यांच्या कुटुंबीयांसाठी हा आनंदी सुवर्णक्षण ठरला आहे. उपळेकर कुटुंबीयांसोबतच कोल्हापूरच्या कला परंपरेसाठी हा क्षण संस्मरणीय ठरला आहे.