कोल्हापूर: कोल्हापूर म्हटलं तर आपसूकच राजर्षी शाहू महाराजांचे नाव तोंडात येतं. कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, खासबागेतील कुस्ती, निसर्गरम्य रंकाळा अशा विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूरच्या महापालिकेचा इतिहासही तितकाच रंजक आहे.
सतराव्या शतकात मराठेशाहीचे राजकीय सत्ताकेंद्र म्हणून महत्व असलेले कोल्हापूर राजर्षी शाहू महाराजाच्या काळातही सामाजिक क्रांतीमध्ये नेहमीच अग्रेसर राहिलंय. या शहराने आतापर्यंत अनेक आंदोलनं पाहिलेत, राज्यात कोणतंही सामाजिक वा राजकीय आंदोलन असो, कोल्हापूर नेहमीच अग्रेसर राहिलं आहे. आजही सामाजिक क्रांतीचं आणि आंदोलनाचं शहर असाच या शहराचा लौकिक आहे.
कोल्हापूर नगरपालिकेची स्थापना
कोल्हापूर शहराचं व्यवस्थापन महानगरपालिकेकडून केलं जातं. भाऊसिंगजी रोडवर महापालिकेची इमारत आहे. ब्रिटिशांच्या काळात म्हणजे 12 ऑक्टोबर 1854 रोजी कोल्हापूरला नगपालिका स्थापन करण्यात आली. नगरपालिकेची स्थापना झाली त्यावर्षी वार्षिक खर्च 300 रुपये इतका होता. त्यावेळी कोल्हापूर शहराची लोकसंख्या 40 हजारांच्या घरात होती. नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर कोल्हापूर शहराच्या पध्दतशीर रचनेस प्रारंभ झाला. नियोजित पद्धतीने आखणी करुन सुस्थित नागरी जीवनाच्या उभारणीसाठी सुरुवात झाली. 1941 ते 1944 हा कालावधी नगरपालिकेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. या काळात नागरी जीवनाच्या विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण परिवर्तन घडून आलं.
मार्च 1941 मध्ये झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संघ ही संस्था स्थापन करण्यात आली. त्यात भाई माधवराव बागल, शेठ गोविंदराव कोरगांवकर, भारतरत्न रत्नाप्पा कुंभार या तिघांचे नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात आले. कोणताही भेद न करता जनतेची निरपेक्ष सेवा करणे हे या संघाचे ध्येय होतं. इतर कोणत्याही राजकीय संस्थेशी या संघाचा संबंध नव्हता. सरकारने स्थानिक स्वराज्याचे जेवढे हक्क जनतेच्या हवाली केले आहेत त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेणे हे आपल्या संघाचे कर्तव्य असल्याचं या संघाच्या जाहीरनाम्यात म्हंटलं होतं.
गतिमान विस्ताराचा कालखंड
1944 ते 1971 हा कालखंड कोल्हापूर शहराच्या गतिमान विस्ताराचा कालखंड होय. या काळात नगरपालिकेची महानगरपालिकेकडे वाटचाल झाल्याचं दिसून येतंय. 1960 साली नगरपालिकेत 44 सदस्य कार्यरत असल्याचं नोंद आहे. त्यापैकी 37 सर्वसाधारण, 3 मागासवर्गीयांसाठी राखीव आणि 4 जागा स्त्रियांसाठी राखीव होत्या. सर्वसाधारण सभा, मुख्याधिकारी आणि स्थायी समिती या प्रशासकीय त्रिकोणावर पालिकेचा कारभार चालत असे.
मुख्याधिकारी यांच्या मदतीस अभियंता आणि आरोग्य अधिकारी यांच्याशिवाय लेखाधिकारी, पर्यवेक्षक, जकात व कर अधीक्षक हे सुध्दा मदतीस असत. 1956-57 साली कर इत्यादी मार्गांनी नगरपालिकेचे वार्षिक उत्पन्न 33 लाख 21 हजार 213 रूपये होते. तर खर्च 29 लाख 29 हजार 161 रूपये होता. यावरून नगरपालिकेचा वाढता व्याप स्पष्ट होतो. या काळात शहरात रस्त्यांचे जाळे तयार झाले. आवश्यक तेथे नवीन पूल उभारण्यात आले. पाणीपुरवठा व्यवस्था कार्यक्षम करण्यात आली. नवनवीन मार्केट, उद्याने उभारून शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यात आली.
कोल्हापूर शहरात उद्योगप्रियता वाढीस लागून परिणामी यंत्रमहर्षी वाय.पी.पवार, महादबा मिस्त्री, तात्या शिंदे, कै. रामभाई सामाणी इत्यादींच्या कष्टपूर्वक प्रयत्नामुळे यांत्रिकीकरणाचे नवे युग सुरू झाले. उद्यम नगरीचा विशाल परिसर यंत्र सामुग्री आणि सुटे भाग यांच्या निर्मिती कार्यात मग्न राहिला. कोल्हापूर उद्योग वसाहतीतील उत्पादने अनेक आशियाई आणि आफ्रिकन देशात निर्यातही होऊ लागली. कोल्हापूर शहराच्या औद्योगिक वाटचालीत नगरपालिकेने वारंवार सहाय्यभूत असे कार्य केलं आहे.
याच कालखंडात 1962 साली डॉक्टर राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली आणि कोल्हापूर हे प्रगत शैक्षणिक पुनर्रचनेचं केंद्र म्हणून उदयास आले. या काळात अशा प्रकारे नगरपालिकेच्या सहयोगाने औद्योगिक आणि शैक्षणिक पुनर्रचनेस हातभार लागला. डिसेंबर 1972 मध्ये नगर परिषद मंडळ बरखास्त करण्यात आली.
महापालिकेत रुपांतर
नगर परिषदेचे 15 नोव्हेंबर 1972 मध्ये महानगरपालिकेत रूपांतर झाले. शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या नागरी समस्या सोडविण्यासाठी महानगरपालिका ही काळाची गरज होती. 1972 ते 1978 या काळात व्दारकानाथ कपूर, ना.मा.देवस्थळे, डी.टी. जोसेफ, वि. ना. मखिजा यांनी प्रशासक या नात्याने कार्य पाहिले. शहराची सुधारित विकास योजना हे महानगरपालिकेचे मोठे ध्येय होतं. 1960 च्या नगर विकास योजनेनुसार नगर रचना शास्त्राच्या आधारे उपनगराची रचना करण्यात आली. विकास योजना राबविताना विस्थापित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन करण्याचा कार्यक्रम अंमलात आणण्यात आला.
लोकनियुक्त प्रतिनिधींचे युग
ऑगस्ट 1978 मध्ये खऱ्या अर्थाने पहिली लोकनियुक्त महानगरपालिका अस्तित्वात आली. या काळात बाबासाहेब कसबेकर (1978 ते 1979), नानासाहेब यादव (979 ते 1980), द. न. कणेरकर (1980), बाबुराव पारखे (1980 ते 1981), प्रा. सुभाष राणे यांनी महापौर या नात्याने कोल्हापूर शहराच्या विकासात सिंहाचा वाटा उचलला. नानासाहेब यादव यांच्या काळात भारतात अन्यत्र कुठेही नसलेली स्मशानभूमीत मोफत प्रेत दहन करण्याची यंत्रणा अमलात आली. द. न. कणेरकर यांच्या कारकीर्दीत कावळा नाका येथे रणरागिणी ताराराणीचा पुतळा उभारण्यात आला आणि आधुनिक पध्दतीचे रस्ते करण्याच्या कामाचा शुभारंभ झाला.
सध्याचं स्वरुप
गेल्या 50 वर्षात हद्दवाढ न झालेलं कोल्हापूर हे राज्यातील एकमेव शहर आहे. सध्या या शहराचं क्षेत्र हे 66.82 किमी इतकं आहे. गेल्या 50 वर्षात कोल्हापूरची लोकसंख्या ही नऊ पटीनं वाढली आहे. त्यामुळे हद्दवाढ हा मुद्दा या निवडणुकीत चांगलाच गाजणार असा दिसतोय.
पक्षीय बलाबल
कोल्हापूर महापालिकेची मुदत ही नोव्हेंबर 2020 साली संपली आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता त्यावेळी महापालिकेवर प्रशासन नेमण्यात आलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक लवकरात लवकर घ्यावी लागणार आहे. महापालिकेत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. महापालिकेचं पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे,
- काँग्रेस- 30
- राष्ट्रवादी- 14
- ताराराणी आघाडी- 19
- भाजप- 14
- शिवसेना- 4