कोल्हापूर: करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवास गुरुवारपासून प्रारंभ झाला. यंदाच्या नवरात्रौत्सवात देवीला सुवर्ण पालखीत विराजमान करुन, तीची मंदिर प्रदक्षिणा पालखी काढण्यात आली. हा सोहळा पहाण्यासाठी हजारो भक्त मंदिर परिसरात दाखल झाले होते.


हजारो भक्तांनी सोनं दान करुन, 2 वर्षात ही सुवर्ण पालखी तयार करण्यात आली आहे. नवरात्रौत्सवानिमित्य कोल्हापुरात नऊ दिवस देवीचा पालखी सोहळा असतो.

यापूर्वी लाकडी पालखीतून देवीची पालखी निघत असे. मात्र यंदा सोन्याच्या पालखीतून प्रदक्षिणा घालण्यात आली.

रात्री साडेनऊ वाजता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पालखी प्रदक्षिणा सोहळा सुरु झाला. यावर्षी प्रथमच देवीच्या पालखी सोहळ्यासाठी सुवर्णपालखी वापरली जाणार असल्याने, करवीरकरांमध्ये मोठी उत्सुकता होती. त्यामुळेच पालखी सोहळ्यासाठी मंदिर परिसरात हजारो भाविक दाखल झाले होते.