औरंगाबाद : औरंगाबादच्या जायकवाडी धरणातून काल (गुरुवार) रात्री ११ वाजल्यापासून गोदावरी पात्रात १० हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात येत आहे.
धरणाच्या २७ दरवाज्यांपैकी १० ते २७ क्रमांकाचे असे १८ दरवाजे प्रत्येकी ६ इंचानं उघडण्यात आले आहेत. धरणाचे १ ते ९ क्रमांकाचे ९ दरवाजे हे आणीबाणीसाठी राखून ठेवण्यात आलेले आहेत. पाण्याची आवक आणि पाणलोट क्षेत्रातील पाऊस लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती औरंगाबाद पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी दिली आहे.
जायकवाडी धरण 95 टक्के भरलं आहे. तब्बल 9 वर्षांनी जायकवाडी धरण पूर्ण भरलं आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीनं गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.