Kokan Refinery : कोकणातील रिफायनरीचा मुद्या आता आणखी तापण्याची चिन्ह आहेत. रिफायनरी समर्थक आणि विरोधकांकडून आता राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू करण्यात येणार आहेत. राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरीच्या मुद्यावर आता दोन्ही बाजूने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रिफायनरीबाबत सकारात्मक पत्र लिहिल्याचे समोर आल्यानंतर समर्थक आणि विरोधक जोरदार मोर्चेबांधणी करत आहेत. रिफायनरीविरोधात मोर्चा काढल्यानंतर आता विरोधक सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेणार आहेत. तर, रिफायनरी समर्थकांनी 'चलो दिल्ली'चा नारा दिला आहे. आपल्या दिल्ली भेटीत रिफायनरी समर्थक थेट केंद्रातील मंत्र्यांची भेट घेत रिफायनरीच्या सकारात्मक निर्णयासाठी प्रयत्न करणार आहेत. 


कोकणात रिफायनरी हवी का नको? कोकणातील रिफायनरीला स्थानिकांच विरोध कि समर्थन? शिवसेनेची भूमिका काय? या साऱ्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं पत्र समोर आले. विरोधातील शिवसेना रिफानरीबाबत सकारात्मक असल्याचं दिसून आलं. पण, असं असलं तरी शिवसेनेनं मात्र स्थानिकांची भूमिका ती आमची भूमिका म्हणत पुन्हा एकदा सोयीस्कर भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. 


दरम्यान, 30 मार्च रोजी रिफायनरी विरोधकांनी मोठ्या संख्येनं मोर्चा काढत नवीन जागेवरील रिफायनरीला आपला विरोध असल्याचं देखील दाखवून दिलं. राजापूर शहरातील जवाहर चौक ते तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चात शिवसेनेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिवसेनेनं आमचा विश्वासघात करू नये अशी मागणी देखील करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेनं स्थानिकांना हवंय ते आम्ही करणार असल्याचं सांगतिले. 


प्रकल्पाला विरोध का? 


कोकणात चर्चेत असलेल्या रिफायनरीच्या प्रकल्पातून जवळपास 3 लाख कोटींची गुतंवणूक अपेक्षित असून किमान लाखभर नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. स्थानिक बाजारात मोठ्या प्रमाणात पैसा खेळता राहणार असून देशाच्या आणि राज्याच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण, त्यानंतर देखील स्थानिकांनी या प्रकल्पाला मोठ्या संख्येनं विरोध दर्शवला आहे. रिफायनरी प्रकल्पामुळे प्रदूषण होणार असून कोकणच्या सौंदर्यावर घाला येणार आहे. समुद्रात देखील प्रदूषण वाढणार असून या भागातील जैवविविधतेला धोका निर्माण होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रकल्पाला विरोध असून इतर कोणत्याही प्रकारच्या प्रकल्पांना आमचा पाठिंबा असल्याचं स्थानिकांनी मोर्चाच्या वेळी सांगितले. त्यामुळे या पार्श्वभूमीवर आता केंद्राची भूमिका महत्त्वाची असणार आहे. 


6 एप्रिल महत्त्वाचा दिवस


मुख्य बाब म्हणजे बुधवार अर्थात 6 एप्रिलचा दिवस हा प्रकल्पाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मानला जातो. यावेळी राजापूर तालुक्यातील धोपेश्वर या गावचा ग्रामसभा आहे. त्यावेळी स्थानिकांचं मत रिफायनरी प्रकल्पााबत घेतलं जाणार आहे. जवळपास 5 हजार एकर जमिन या गावची आहे. मुख्य बाब म्हणजे ग्रामसभेच्या ठरावाला कोणतीही कायदेशील मान्यता नसली तरी या गावच्या स्थानिकांचं मत काय आहे? याचा कल जाणून घेण्यास  मदत होणार आहे. गावचे नागरिक अर्थात ज्या व्यक्तिकडे मतदान कार्ड आहे अशा व्यक्तिला या रिफायनरीबाबतच्या ठरावावेळी मतदान करता येणार आहे.