पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुंडगिरी सुरू, भाजप जशास तसं उत्तर देणार; किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Kirit Somaiya Car Attack : किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुंडशाही सुरू असून लोकशाही पायाखाली घातली जात आहे. याला भाजप जशास तसं उत्तर देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. रविवारी आपण गृहसचिवांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, किरीट सोमय्यांनी आपल्यावर हल्ला होणार आहे याची माहिती आधीच पोलिसांना दिली होती. त्यावर कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही. पोलिसांच्या संरक्षणामध्ये ही गुडंगिरी चालली आहे. मुंबई पोलिसांची अब्रू या पोलिसांनी घालवली आहे. लोकशाही पायाखाली घातली जात आहे.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "रात्रीच्या वेळी एका महिलेला पोलीस कस्टडीमध्ये ठेवता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. पण त्याचे उल्लंघन करुन नवनीत राणा यांना पोलीस स्टेशनमध्ये ठेवलं गेलं. या संबंधी आपण उद्या राज्याच्या गृहसचिवांची भेट घेणार आहोत. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यासारख्या वागणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा अशी मागणी आपण करणार आहोत."
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही, जशास तसं उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे. हे तात्काळ बंद नाही झालं तर आम्ही आक्रमक भूमिका घेणार. एका महिलेला हे सरकार घाबरलं आणि आख्खी मुंबई वेठीस धरण्याचं काम राज्य सरकारनं केलं. जे यांचे घोटाळे बाहेर काढण्याचं काम करत आहेत त्यांना हे जीवे मारण्याचा प्रयत्न करत आहेत."
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला असून त्यामध्ये ते जखमी झाले आहेत. राणा दाम्पत्याची भेट घेऊन परतत असताना शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या गाडीवर बाटल्या आणि चपला फेकल्या होत्या. दरम्यान, किरीट सोमय्या हे वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत.
दरम्यान, किरीट सोमय्यांच्या ड्रायव्हरने आपल्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केला आहे.