सांगली : महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्रमध्ये प्रसिद्ध असणारी आटपाडी तालुक्यातील खरसुंडीमधील पौशी यात्रा कोरोनामुळे  भरू शकली नाही. मात्र या यात्रेनिमित्त भरणारा खिलारी जनावरांचा  बाजार भरवण्यास मात्र जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली होती.


मागील वर्षी कोरोनाचा प्रसार झाला , लॉकडाऊन लागला  आणि यात्रा, बाजार यांच्यावर बंदी आली. यामध्ये जनावराचे बाजार देखील मागील एक वर्षापासून होऊ शकले नव्हते. यामुळे जनावरांच्या खरेदी- विक्रीतून फिरणारे अर्थचक्र थांबले होते. मात्र आता कोरोनांनंतर अनेक गोष्टी पूर्वपदावर येत असताना जनावरांचे बाजार देखील भरू लागले आहेत.


महाराष्ट्रात कोरोनानंतरचा पहिला बाजार भरला तो आटपाडी तालुक्यातील खरसुंडीमध्ये. खरसुंडीमध्ये सिद्धनाथ देवस्थानच्या पौशी यात्रेनिमित्त यंदा यात्रा भरली नाही. मात्र  जनावराचा बाजार भरवण्यास प्रशासनाने परवानगी दिली होती.  कोरोनामुळे या जनावरांच्या खरेदी-विक्रीतुन होणारे जे अर्थचक्र थांबले होते ते अर्थचक्र पुन्हा सुरू होण्यास हा जनावरांचा बाजार महत्वाचा ठरला आहे. या खिलारी जनावरांच्या बाजारात 6-7 कोटीच्या उलाढालीचा अंदाज आहे.


आटपाडीत जनावरांच्या बाजारात आला तब्बल दीड कोटींचा मोदी बकरा!


कोरोनामुळे मागील वर्षभरात राज्यात कुठेच जनावरांचा बाजार भरला नाही. त्यामुळे  आता या खिलारी जनावरांच्या बाजारात खरेदी-विक्रीसाठी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली.  शेतकऱ्यांच्या शेतीकामाची निकड आणि मागील वर्षभरापासून रखडलेले अर्थचक्र पाहून काही अटींवर या प्रसिद्ध असलेल्या खिलारी जनावरांच्या बाजारास परवानगी देण्यात आली होती.


पश्चिम महाराष्ट्रातील औंध, पुसेगाव, खटाव, सोलापूर येथील जनावरांचे बाजार यंदा कोरोनामुळे होऊ शकले नव्हते. त्यामुळे खरसुंडी मध्ये भरलेल्या या खिलारी जनावरांच्या बाजारात महाराष्ट्र भरातील शेतकऱ्यानी हजेरी लावली होती. याशिवाय महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातुन वीस हजारांहून अधिक जातिवंत जनावराची आवक या बाजारात झाली होती. लहान खोंडे, शेती कामाच्या बैलजोडी, जातिवंत गाई यासह अनेक जातीच्या गाईची खोंडे यांची या बाजारात चांगल्या दराने विक्री झाली. मागील वर्षभरापासून जनावरांचे बाजार भरले नसल्याने अनेक ठिकाणाहून व्यापाऱ्यांनी देखील या बाजार हजेरी लावली.


साधारणतः या खिलारी जनावरांच्या बाजारातून यंदा 6-7 कोटीच्या वर उलाढाल होण्याचा बाजार समितीला अंदाज आहे. या बाजारात कपिला जातीच्या खोंडाची चर्चा आहे. काळाकुट्ट असलेले ही कपिला जातीच्या खोंडाला 10 लाखाच्या आसपास मागणी आहे.