वर्धा : कोरोनाकाळात कोविड वॉर्डात काम करणारे पीपीई किटमध्येच बंदिस्त राहात असल्याचं चित्र डोळ्यापुढं येतं. पीपीई किटमध्ये बंदिस्त कालावधीत डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना  घामाच्याही त्रासाला सामोरं जावं लागतयं. पण, याच अनुषंगाने वर्ध्यातील सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या मायक्रोबॉयोलॉजी विभागानं संशोधन करत खादीपासून निर्मित केलेल्या बंडीनं या घामातून सुटका केलीय. तसंच इथं तयार केलेले गाऊन पीपीई किटमध्ये परिवर्तित होण्यासाठी सिट्राने हिरवा कंदील दिल्याने मार्ग सुकर झाला आहे.


कोरोनाच्या अनुषंगानं पीपीई किटची मागणी वाढलीय. किटसोबतच त्याचं वेस्टेजदेखील वाढतयं. किट घातल्यानंतर त्यामध्ये बंदिस्त होताच अनेक अडचणीही निर्माण होतात. त्याला अनेक ठिकाणी वेगवेगळे पर्याय शोधण्याचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. असाच प्रयत्न सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेतील मायक्रोबॉयोलॉजी विभागाकडून केला जात आहे.

इथं कमी खर्चात पुनर्वापर होऊ शकणारे गाऊन तयार करण्यात आले आहेत. महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रोफेसर डॉ. राहुल नारंग यांनी डीआरडीओ संस्थेच्या मदतीनं हे संशोधन सुरू केलं आहे. पीपीई किटला पर्याय ठरेल, या अनुषंगानं हे काम सुरू आहे. त्यांनी कापडाबाबत डीआरडीओशी चर्चा केली आहे. त्यावेळी सुरतमधील व्यापाऱ्याकडून पॉलिस्टर त्याला पॉलीयुरेथिनचा कोट असलेला कापड मागवला. मागवलेल्या कापडाचं परीक्षण करून त्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी आवश्यक बाबींचा वापर करत ऑक्टोक्लेविंग करण्यात आलं. या कापडाला पीपीई किटसाठी योग्य असल्याचं सर्टिफिकेशन मिळाले आहे. डीआरडीओ लवकरच याला मान्यता देण्याची शक्यता आता वाढली आहे.



हा गाऊन बनवण्यासाठी प्रती मीटर कपड्यासाठी शंभर रुपये मोजावे लागतात. याचे वजन हलके असून यासाठी केवळ अडीचशे रुपये खर्च आला आहे. पण, पीपीई किट तयार करण्यासाठी खर्चात थोडी वाढ होणार आहे. हा कपडा पुनर्वापर करता येणार असल्यानं साधारण 20 वेळा तो वापरला जाऊ शकतो. कोविड वॉर्डात याचा वापर शक्य झाल्यास कमी खर्चात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. डोक्यावर असणारी कॅपसुद्धा याच्या कपड्यापासून तयार होणार आहे.

खादीपासून निर्मित बंडीला सहा पॉकेट देण्यात आले असून त्यात आईस जेल पॉकेट ठेवून तापमान कमी करण्यात यश आलयं. यात आणखी संशोधन होत आहे. हे संशोधन कोविड वॉर्डात जरी उपयोगी नाही आले तरी इतर वॉर्डांकरीता निश्चितच महत्त्वाचं ठरणार आहे.