नागपूर : एका बाजूला महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये विविध मुद्द्यांवर वाद सुरू आहे. गेले अनेक दिवस प्रशासन आणि सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये 20 जून रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा घ्यावी की नाही या विषयावर वाद सुरु आहे. अखेरीस या वादात राज्य शासनाने अशी सभा घेण्यास हरकत नाही असे अभिप्राय दिल्याने सभा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, महापालिकेचे दोन चाक मानल्या जाणाऱ्या प्रशासन आणि नगरसेवकांच्या भांडणात नागपुरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याचे प्रत्यय नागपूरातील अनेक वस्त्यांमध्ये गेले पाच दिवस पाहायला मिळाले आहे. नागपूर महापालिकेच्या झोन क्रमांक 1 ते 5 मध्ये नागरिकांच्या घरातून कचरा उचलण्याची प्रक्रिया गेले पाच दिवस ठप्प झाली होती. त्याला कारण ठरले होते या भागात कचरा उचलण्याचा कंत्राट असलेले एजी एनव्हायरो कंपनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरु असलेले वेतनाबद्दलचे वाद याच वादामुळे गेले. पाच दिवस उपराजधानीमधील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांना दारावर कोरोना आणि घरात कचरा अशा समस्येला तोंड द्यावे लागत होते.


नागपूरच्या रेशीमबाग परिसरात राहणारे पात्रीकर, फलटणकर आणि त्यांच्यासारखे इतर अनेक कुटुंब गेले पाच दिवस घरात अनेक डस्टबिन आणि पिशव्यांमध्ये कचरा साठवून महापालिकेच्या कचरावाल्याची वाट पाहत होते. अनेक दिवसांचा कचरा घरात साचल्यामुळे सर्वांच्या घरात कुजत वास ही सुटला होता. कोरोना सारख्या महामारीच्या काळात घर स्वच्छ ठेऊन निरोगी राहणे हे प्रत्येक कुटुंबाला आवडत असताना रेशीमबाग आणि त्यासारख्या कित्येक वस्त्यांमध्ये महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनी अचानक संप पुकारल्याने घराघरातून कचरा गोळा करण्याची महापालिकेची यंत्रणा कोलमडून पडली होती. घराबाहेर कचरा टाकण्यास महापालिकेकडून बंदी असल्याने घरातच कचरा कुजवत ठेवण्याशिवाय दुसरा इलाज या वस्त्यांमधील नागरिकांकडे नव्हता. अनेक कुटुंबांनी तर घरी कचऱ्याचे डस्टबिन ओसंडून वाहू लागल्यानंतर नव्या डस्टबिनची खरेदी ही केली होती. तसेच पोत्यांमध्ये, पिशवीमध्ये कसा तरी कचरा साठवला होता. पाच झोन पैकी दोन झोनमध्ये आज सकाळपासून कचऱ्याची गाडी पोहोचली आणि लोकांनी पाच दिवसांचा दुर्गंधी सोडणारा कचरा महापालिकेच्या कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हवाली करत सुटकेचा नि:श्वास सोडला.



आम्ही महापालिकेची कचरा उचलणारी यंत्रणा नेमकी का कोलमडली या बद्दल माहिती घेतली. तेव्हा कळले की, महापालिकेने शहरातील दहा झोन मध्ये दोन कंपन्यांना प्रत्येकी पाच झोनमधून कचरा गोळा करण्याची जबाबदारी दिली आहे. झोन क्रमांक 1 ते 5 मध्ये ही जबाबदारी ए जी एनव्हायरो या खाजगी कंपनीकडे आहे. लॉकडाउनच्या काळापासून कंपनीचे त्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत पगाराला घेऊन वाद असल्याने गेले पाच दिवस पाच ही झोनचे सुमारे बाराशे कर्मचारी अचानक संपावर गेले होते. अर्ध्या शहरात त्यामुळेच कचरा उचलण्याची यंत्रणा कोलमडली होती.आम्ही या विषयावर महापौर संदीप जोशी यांना विचारले असता त्यांनी प्रशासन नागरिकांच्या समस्येबद्दल गंभीर नसल्याचे आरोप केले आणि या स्थितीसाठी महापालिका प्रशासनाला जबाबदार धरले. गेल्या पाच दिवसात आरोग्य अधिकाऱ्यांना अनेक वेळेला सांगून ही स्थिती बदलत नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, वैयक्तिक पातळीवर ए जी एन्व्हायरो कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलून पाच पैकी दोन झोनमधला संप आज सकाळपासून संपुष्टात आला असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना फोटोसेशन करण्यापासून वेळ नसल्याने ही स्थिती उद्भवल्याचा आरोप ही त्यांनी केला.

गेले अनेक आठवडे नागपूर महापालिकेत सर्वपक्षीय नगरसेवक आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यात सतत शह मातचा खेळ सुरु आहे. कधी एकमेकांना भेटण्याच्या मुद्द्यावर तर कधी विकास कामांच्या प्राधान्य क्रमाबद्दल हे वाद उफाळून येते. 20 जूनला महापौरांनी बोलावलेल्या सर्वसाधारण सभेच्या मुद्द्यावरही सर्वपक्षीय नगरसेवक आणि आयुक्त समोरासमोर आले होते. अखेरीस राज्य सरकारच्या अभिप्रायानंतर उद्या सर्वसाधारण सभा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, शहरातील अनेक नागरिक महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये शुल्लक कारणावरून सुरु असलेल्या अशा नसत्या वादांमुळे कमालीचे नाराज आहेत. तुमच्या दोघांच्या भांडणात आमचा खेळ खंडोबा का करता असा रास्त प्रश्न अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे.


महापौरांच्या हस्तक्षेपानंतर दोन झोनमधला कचरा कोंडीचा प्रश्न सुटला असला तरी उर्वरित तीन झोनमध्ये अजून ही कचरा उचलण्याची यंत्रणा पूर्ववत झालेली नाही. 20 जून रोजी महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून त्यामध्ये ही या प्रश्नावर प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनासारखी जागतिक महामारी पसरली असताना उपराजधानीतले नागरिक कचऱ्यासारख्या समस्येचा सामना करत आहेत. ही स्थिती स्मार्टसिटी म्हणवणाऱ्या नागपूरसाठी नक्कीच भूषणावह नाही.


संबंधित बातम्या :


कंत्राट असक्षम कंपन्यांना देऊन नागपूरकरांना कचऱ्यात ढकललं; शिवसेनेचा भाजपवर आरोप