कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेत निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय झाला असून आता राजू शेट्टी आमदारकी स्वीकारणार असल्याची माहिती आहे. राजू शेट्टी यांच्या बैठकीत नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक याची नाराजी दूर करण्यात आली आहे.


विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांचं नावं निश्चित करण्यात आलं होतं. यासंदर्भात शेट्टी यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती. मात्र यानंतर संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करत दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ब्यादच आपल्याला नको, असं म्हटलं होतं. राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका मांडत समोरून झालेले तलवारीचे घाव भरून निघतात, पण घरच्या कट्यारीचे घाव जिव्हारी लागतात. चळवळ संपवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, पण आम्ही रक्त सांडून चळवळ उभा केलीय, कुणाचा मायावी प्रयत्नाने संपणार नाही, असं म्हटलं होतं.

हे ही वाचा- नात्यात अंतर पडत असेल तर विधानपरिषदेची ब्याद नको : राजू शेट्टी

राजू शेट्टी यांनी अशी भूमिका मांडल्यानंतर राज्यभरातून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी आमदारकी स्वीकारावी, अशी मागणी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवा अध्यक्षा पूजा मोरे यांनी तर रक्ताने पत्र लिहित राजू शेट्टी यांनी विधानपरिषद आमदारकी स्वीकारावी अशी मागणी केली होती. तर शेट्टी यांनी आमदारकी न स्वीकारल्यास काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा देखील दिला होता.

हेही वाचा - राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर

यानंतर काल राजू शेट्टी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत संघटनेत निर्माण झालेला वाद अखेर मिटला. शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय या बैठकीत झाला. राजू शेट्टी यांनी या बैठकीत नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक यांची नाराजी दूर केली. काल या दोन्ही नेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर वादावर पडदा पडला. चळवळीला नख लागेल असं कोणतंही पाऊल उचलणार नाही असं नाराज झालेल्या दोन्ही नेत्यांनी राजू शेट्टी यांनी बोलून दाखवलं होतं. चर्चेतून नाव पुढे यावं अशी नाराज नेत्यांची मागणी होती.

BLOG | पुन्हा एकदा शेतकरी चळवळीची पांगापांग!