कोल्हापूर : देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. प्रत्येकजण कोरोनाच्या भीतीने गांगरून गेला होता. अशावेळी कोल्हापूर शहरामध्ये एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरू झाली होती आणि ती व्यक्ती म्हणजे खच्याक मामा! मात्र, आज अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि खच्याक मामाने या जगाचा निरोप घेतला.


कसबा बावड्यात राहणारे बाबुराव पाटोळे उर्फ खच्याक मामा यांचे आज निधन झाले. इंग्रजी भाषेतून खच्याक मामा कोरोना संबंधित नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत होते. त्यांची शब्दफेक अनेकांना जमायची नाही. त्यांची इंग्रजीमधील वाक्य ऐकूण अनेकजणांच्या भुवया उंचावल्या होत्या. एका दमात कोरोना कुठून आला? कसा आला? त्यावर उपाय म्हणजे नेमकं काय करायचे हे देखील खच्याक मामा सांगायचे. कोल्हापूर शहरातील असं कोणतंही ठिकाण शिल्लक राहीलं नाही की त्याठिकाणी जाऊन खच्याक मामाने आपली शब्दफेक केली नाही.


मराठी बरोबर हिंदी सिनेमांमधील गाणी खच्याक मामा आपल्या खास शैलीत म्हणत होते. हिंदी सिनेमातील डायलॉग हुबेहूब म्हणायची कला खच्याक मामाजवळ होती. कुणाला कुठेही भेटला की कोरोनाबाबत काळजी घेण्याच्या चार गोष्टी समजून सांगणार म्हणजे सांगणार. खच्याक मामा उच्चशिक्षित होते. चांगल्या वाईटाची त्यांना जाण होती. त्याचमुळे तरुणाईमध्ये खच्याक मामाची क्रेझ होती. त्यावेळी खच्याक मामाचे सोशल मीडियावर प्रंचड व्हिडीओ व्हायरल झाले.


खच्याक मामाच्या अशा अचानक जाण्यामुळे शहरात शोककळा पसरलीय. कोल्हापूर शहरातीलच नाही तर जिल्ह्यातील प्रत्येक तरुणाच्या मोबाईलवर खच्याक मामाला श्रद्धांजली वाहिल्याचे स्टेट्स पाहायला मिळतायेत.