कोची :  देशात 30 जानेवारीला कोरोनाचा पहिला रुग्ण केरळ राज्यात सापडला. कोरोना रुग्णांच्या संख्येत केरळ बरेच दिवस देशात नंबर वन होतं. मात्र, केरळने हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात ठेवली. आत्ताच्या घडीला केरळमध्ये 732 कोरोनाबाधित आहेत. त्यातले 512 बरे झाले आहेत. तर 4 जणांचा मृत्यू झाला. आत्ता केरळमध्ये फक्त 220 रुग्ण आहेत. केरळचा रिकव्हरी रेट म्हणजे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे सर्वाधिक म्हणजे 69.94 टक्के इतकं आहे. केरळमधील कोरोनाप्रसार रोखण्यात एक मराठमोळं नाव सुद्धा आहे.


विजय साखरे हे मूळचे नागपूरचे असून आयपीएस (IPS) अधिकारी आहेत. ते सध्या पोलीस महानिरिक्षक (IGP) आणि कोचिनचे पोलिस आयुक्त म्हणून कर्तव्य बजावत आहेत. सुरुवातीला रेड झोन असलेल्या कासरगोड जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणाची जबाबदारी विजय साखरे यांच्यावर होती. त्यांनी कासरगोड कोरोनामुक्त करुन दाखवलं आहे.



केरळमध्ये सर्वात आधी रुग्ण सापडला. त्यानंतर केरळ सरकारने पहिल्यांदा महत्तवाची पावलं उचलली. कासरगोडमध्ये कोरोनाला थांबवण्यासाठी थ्री लॉक रणनीती आखली गेली. ज्या रणनितीच देशभरात कौतुक झालं.या विषयी साखरे यांना विचारले असता ते म्हणाले, लॉक डाऊनमध्ये लोकं ऐकत नाहीत भाजीपाला घ्यायला गर्दी करतात , नमाज किंवा प्रार्थनेसाठी गर्दी करतात. अशा वेळी सर्व लोकांना घरात लॉक करण्यापेक्षा बाधित रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु केले. या रुग्णांची घर कुठे आहेत याचा शोध घेतला. त्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह, प्रायमरी, सेकंडरी असे लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरु केले. त्यानंतर घर संपूर्ण जिल्ह्यात नाही असे आढळले. या लोकांना घरात आयसोलेट केले तर संसर्ग बाहेर जाणार यासाठी 11 कंटेन्मेंट झोन बनवले. कोरोनाबाधित रुग्णांच्या घरासमोर गार्ड ठेवले, त्यामुळे ते घरातून बाहेर पडणार नाही यासाठी पोलिस गार्ड ,ड्रोनच्या आणि सीसीटीव्हीच्या सहाय्याने नजर ठेवली. इन्फेक्शन बाहेर जाणार नाही याची काळजी घेतली.