मुंबई: असंख्य गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा चुना लावणारा 'केबीसी'चा संचालक भाऊसाहेब चव्हाणला अखेर जेरबंद करण्यात यश आलं आहे. भाऊसाहेब चव्हाणला मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे.


 

'केबीसी' कंपनीच्या माध्यमातून, गुंतवणूकदारांना अल्पावधीत दामदुप्पट आणि अधिक व्याजदराचं आमीष दाखवून, त्यांची रक्कम लाटल्याचा आरोप भाऊसाहेब चव्हाणवर आहे. गुंतवणूकदारांना तब्बल 220 कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी, तो मुख्य आरोपी आहे. मात्र तो सिंगापूरला पळून गेल्यामुळे त्याला अद्याप अटक झाली नव्हती. आज मुंबईत आला असता, विमानतळावरुच त्याला अटक करण्यात आली.

 

लाखो गुंतवणूकदारांना चुना

गुंतवणुकीपोटी दामदुप्पट परताव्याचे आमिष दाखवून, भाऊसाहेब चव्हाणच्या ‘केबीसी’ कंपनीने राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना चुना लावला. अनेकजण ‘केबीसी’च्या आमिषाला भुलले आणि आयुष्यभर राबून मिळवलेली रक्कम ‘केबीसी’मध्ये गुंतवली. मात्र, यातील बहुतेकांना दगाफटका झाला.

 

त्यांना परतावा तर सोडाच परंतु मूळ रक्कमही मिळाली नाही. या प्रकरणात गुंतवणूकदारांच्या असंख्य तक्रारी फेब्रुवारी 2014 दरम्यान राज्यातील विविध पोलिस ठाण्यांत दाखल झाल्या.  त्यानंतर केबीसीचा संचालक भाऊसाहेब चव्हाणसह पत्नी आणि मेहुण्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. मात्र भाऊसाहेब चव्हाण सिंगापूरला पसार झाला.

असा होता ‘केबीसी’चा मायाजाल :

17 हजार 500 गुंतवणारे सात सदस्य केले की, महाराष्ट्रात एक मोफत टूर

17 हजार 500 गुंतवणारे 36 सदस्य केले की, गोव्याक एक मोफत टूर

17 हजार 500 गुंतवणारे 81 सदस्य केले की, दर महिन्याला पाच हजाराचा धनादेश

17 हजार 500 गुंतवणारे 252 सदस्य केले की, एक लाखाचा एक चेक किंवा दरमहा दहा हजार रुपयांचा चेक

17 हजार 500 गुंतवणारे 756 सदस्य केले की, एजंटला दर महिन्याला 51 हजार रुपये

17 हजार 500 गुंतवणारे 2268 सदस्य केले की, एजंटला प्रतिमहिना एक लाख किंवा सात लाखाचे दागिने

17 हजार 500 गुंतवणारे 6804 सदस्य केले की, एक स्कोडा गाडी मोफत

17 हजार 500 गुंतवणारे 12600 सदस्य केले की, 51 लाखांचा बंगला मोफत

17 हजार 500 गुंतवणारे 25556 सदस्य केले की, एक कोटी रोख रक्कम मिळणार

अशा क अनेक स्किम्समुळं चव्हाणच्या केबीसीचं जाळं काही दिवसातच दूरवर पसरलं. सुरवातीच्या काळात त्यांना आपल्या अटी पूर्णही केल्या. पण नंतर सदस्यांची संख्या वाढली. पैसा गोळा झाला आणि चव्हाण लोकांना गंडवत पळ काढला.


संबंधित बातम्या


बी कॉम नवरा, तिसरी नापास बायको आणि केबीसी घोटाळा


..तरच पैसे मिळतील, KBC च्या भाऊसाहेब चव्हाणचं नवं आमिष 


केबीसी घोटाळ्यामुळे संपूर्ण गावच बुडालं!


..तर दहा हजार कोटीचा 'केबीसी' घोटाळा टाळता आला असता!