बीड : राज्याच्या ग्रामविकासमंत्री पकंजा मुंडे यांचा 'दुष्काळ सेल्फी' काही दिवसांपूर्वी चांगलाच वादात सापडला होता. पण पंकजा मुंडे यांच्या एका फोटोमुळेच हरवलेला सहा वर्षांचा चिमुकला सापडला.

 

 

काय आहे प्रकरण?

परळीच्या भीमनगर भागातील रहिवासी केशव वैजनाथ आदोडे हे पत्नी अर्चना आणि मुलगा सुशीलसह देव दर्शनासाठी चंद्रपूरला गेले होते. परत येताना 30 एप्रिल रोजी नांदेडमध्ये बहिणीकडे पाहुणचार घेतला. त्यानंतर आदोडे दाम्पत्य मुलासह परळीला जाण्यासाठी नांदेड रेल्वे स्थानकावर आले. पण स्थानकावरील गर्दीत सुशील आईचा हात सोडून स्थानकाबाहेर कधी गेला, हे त्यांनाही कळलं नाही. सुशील बेपत्ता झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर आदोडे यांनी रेल्वे पोलिसांना सांगितलं. पण त्याचा कुठेच शोध लागला नाही.

 

तर दुसरीकडे हरवलेला सुशील स्थानकाबाहेर आला. पण काहीच न कळाल्याने चिमुकला सुशील नरसी नायगावकडे जाणाऱ्या वडापमध्ये बसला. नरसी नायगाव इथे सर्व प्रवासी उतरले, पण सुशील एकटाच राहिल्याने चालकाने त्याची चौकशी केली. परंतु त्याला काहीच बोलता न आल्याने चालकही हतबल झाला. शेवटी त्याने सुशीलला पोलिसांच्या हाती सुपूर्द केलं.

 

 

...आणि मुलगा आई वडिलांना भेटला

पंकजा मुंडे 30 एप्रिलला नांदेड दौऱ्यावर होत्या. नायगाव नरसी येथे त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. सुशीलची नजर त्या बॅनरकडे गेली आणि त्याने बॅनरवर असलेल्या पंकजा मुंडे यांच्या फोटोकडे बोट दाखवून मी यांच्या गावचा आहे, असं पोलिसांना सांगितले. त्यानंतर नांदेड पोलिसांनी बीड पोलिसांच्या मदतीने सुशीलला भीमनगरमध्ये त्याच्या आई-वडिलांकडे सुखरुप पोहोचवलं. फक्त पंकजाताई यांच्या फोटोमुळे माझा मुलगा परत मिळाला, अशी प्रतिक्रिया सुशीलच्या वडिलांनी दिली.