Kartiki Ekadashi 2022:  कार्तिकी एकादशीची (Kartiki Ekadashi Mahapuja) महापूजा उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते होणार असून आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही पूजा करायचा मान मिळविणारे हे राज्यातील पहिले दाम्पत्य ठरणार आहे. आज रात्री बारा वाजता विठुरायाच्या नित्यपूजेस सुरुवात होणार असून यानंतर देवाची पाद्यपूजा केली जाईल. या पूजेवेळी रात्री 12 वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे.  पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहकुटुंब मंदिरात पोहोचेल. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत , महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , मंत्री संदीपान भुमरे , खासदार रणजित निंबाळकर , आमदार समाधान अवताडे उपस्थित असतील. 


विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणीमातेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाल्यावर पहाटे साडे तीन वाजता विठ्ठल सभामंडपात उपमुख्यमंत्री आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार होणार आहे. साधारण उद्या म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीला पहाटे चार वाजता राज्यभरातून आलेल्या भाविकांना दर्शनास सुरुवात होणार आहे. 


विठ्ठल मंदिरात 15 प्रकारच्या तब्बल 6 टन फुलांची आकर्षक सजावट


कार्तिकी एकादशीच्या महासोहळ्यासाठी आज विठ्ठल मंदिरात 15 प्रकारच्या तब्बल 6 टन फुलांची आकर्षक सजावटीला सुरुवात झाली असून पुणे येथील भाविक राम जांभुळकर हे ही सजावट करत आहेत.  विठ्ठल सभामंडप, रुक्मिणी सभामंडप, महाद्वार, विठ्ठल सोळखांबी, चौखांबी या ठिकाणी 15 कारागीर ही सजावट करत आहेत. या सजावटीचे सर्व पॅटर्न पुणे येथील 40 कारागिरांनी तयार केले आहे.


कार्तिकी यात्रेला वारकऱ्यांच्या संख्येत निम्म्याने घट


राज्यभर झालेल्या परतीच्या पावसाचा सर्वात मोठा फटका यंदाच्या कार्तिकी यात्रेला बसला असून वारकऱ्यांच्या संख्येत निम्म्याने घट झाल्याचे चित्र आहे. भाविकांच्या निवासासाठी प्रशासनाच्या 65 एकरावरील भक्तिसागर या निवासतळावरील निम्मे प्लॉट मोकळे पडले आहेत. यात्राकाळात कायम गजबजलेला हा भक्तिसागर मोकळा पडला आहे. राज्यभर यंदा परतीच्या पावसाने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते . यानंतर या नुकसानीचे पंचनामे अजून सुरूच असल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्याने यंदा कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरवली आहे. आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात अजूनही मोकळे रस्ते असून ज्या भक्तिसागरमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्त भाविक दरवर्षी निवास करतात तिथे केवळ एक लाख 68 हजार भाविकांच्या निवासाची नोंद झाली आहे. अजूनही जवळपास 180 प्लॉट मोकळे असल्याने या परिसरात यात्रेचं वातावरण देखील दिसत नाही. 


व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसणार


राज्य शासनाने या 65 एकर क्षेत्रावर भाविकांसाठी मोफत निवास तळ उभारला असून येथील भाविकांना वीज, पाणी आणि आरोग्याच्या मोफत सुविधा दिल्या आहेत. दरवर्षी किमान 15 दिवस आधीपासून येथील सर्व 497 प्लॉट बुक झालेले असतात. यानंतर येथे जागा मिळविण्यासाठी दरवर्षी मोठी वादावादी देखील पाहायला मिळते. मात्र यंदा कार्तिकी दशमीला निम्म्यापेक्षा जास्त भाविकांनी पाठ फिरविल्याने यात्रा फेल गेली आहे. दिवाळीच्या सुट्टीत रोज हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केल्याने यंदा दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात होणारी यात्रा विक्रमी होणार अशी अपेक्षा होती. पण वारकऱ्यांनी कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरविल्याने व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसणार आहे . 


 


ही बातमी देखील वाचा


Pandharpur : कार्तिकी यात्रेत चोरांना पकडण्यासाठी पोलीस बनले वारकरी, चार चोर ताब्यात