Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये भक्तांचा जनसागर लोटला आहे. या काळात चोऱ्यांची संख्याही वाढते. मात्र यंदा चोरांवर पोलिसांची करडी नजर आहे. पोलिसांना चोरांना वेसन घालण्यासाठी नामी युक्ती शोधली आहे. वारकऱ्यांना चोरांचा नाहक त्रास सहन करावा लागू नये, यासाठी आता पोलीसही वारकरी बनले आहेत. यात्राकाळात भाविकांना सर्वात जास्त त्रास असतो तो चोरांचा, मात्र पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या युक्तीमुळे वारकऱ्यांना लुटणारे चोर सहज पोलिसांच्या हातात सापडत आहेत. पोलीस वारकऱ्याच्या रुपात परिसरात नजर ठेवून आहेत. अशाप्रकारे पोलिसांनी आज सकाळपासून चार चोर पकडले आहेत. 


चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग आणि दर्शन रांगेत जवळपास 50 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वारकऱ्यांच्या वेशात फिरत असून अशा चोरांवर त्यांची करडी नजर आहे. चोऱ्या करण्यासाठी चोर वारकऱ्यांच्या वेशात येत असल्याने यंदा पोलिसांनीही वारकरी वेशातील पोलिसांच्या टीम बनविल्या आहेत. ही पोलिसांची पथकं गर्दीच्या ठिकाणी वारकरी बनून फिरत आहेत. आज सकाळी चंद्रभागा वाळवंटात वारकऱ्यांना लुटणाऱ्या चार चोरांना या वारकरी वेशातील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पहाटे चार वाजेपासून पोलिसांच्या या टीम सर्व ठिकाणी फिरत आहेत. पोलिसांनी वारकऱ्याचं हुबेहूब वेषांतर केल्याने याला चोर देखील फसू लागले आहेत.


निम्म्यापेक्षा जास्त भाविकांची यात्रेकडे पाठ


राज्यभर झालेल्या परतीच्या पावसाचा सर्वात मोठा फटका यंदाच्या कार्तिकी यात्रेला बसला असून यात्रेकरूंच्या संख्येत निम्म्याने घट झाल्याचे चित्र आहे. भाविकांच्या निवासासाठी प्रशासनाच्या 65 एकरावरील भक्तिसागर या निवासतळावरील निम्मे प्लॉट मोकळे पडले आहेत. यात्राकाळात कायम गजबजलेला हा भक्तिसागर मोकळा पडला आहे. राज्यभर यंदा परतीच्या पावसाने हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते . यानंतर या नुकसानीचे पंचनामे अजून सुरूच असल्याने आर्थिक अडचणीत आलेल्या शेतकऱ्याने यंदा कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरवली आहे. आज कार्तिक शुद्ध दशमीला शहरात अजूनही मोकळे रस्ते असून ज्या भक्तिसागरमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्त भाविक दरवर्षी निवास करतात तिथे केवळ एक लाख 68 हजार भाविकांच्या निवासाची नोंद झाली आहे. अजूनही जवळपास 180 प्लॉट मोकळे असल्याने या परिसरात यात्रेचं वातावरण देखील दिसत नाही. 


व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसणार


राज्य शासनाने या 65 एकर क्षेत्रावर भाविकांसाठी मोफत निवास तळ उभारला असून येथील भाविकांना वीज, पाणी आणि आरोग्याच्या मोफत सुविधा दिल्या आहेत. दरवर्षी किमान 15 दिवस आधीपासून येथील सर्व 497 प्लॉट बुक झालेले असतात. यानंतर येथे जागा मिळविण्यासाठी दरवर्षी मोठी वादावादी देखील पाहायला मिळते. मात्र यंदा कार्तिकी दशमीला निम्म्यापेक्षा जास्त भाविकांनी पाठ फिरविल्याने यात्रा फेल गेली आहे. दिवाळीच्या सुट्टीत रोज हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केल्याने यंदा दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात होणारी यात्रा विक्रमी होणार अशी अपेक्षा होती. पण वारकऱ्यांनी कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरविल्याने व्यापाऱ्यांना देखील मोठा फटका बसणार आहे . 


ABP च्या दणक्यानंतर चंद्रभागेत करता येतंय सुरक्षित स्नान 


आज कार्तिकी दशमीला चंद्रभागेवर भाविकांचा महासागर लोटला असून ABP माझाच्या दणक्यानंतर आता चंद्रभागेतील पाणी पातळी कमी झाल्याने भाविकांना सुरक्षित स्नानाचा आनंद घेता येत आहे. यंदा कार्तिकी यात्रेला दरवर्षीप्रमाणे नसली तरी भाविकांची गर्दी दिसत आहे. चंद्रभागेचे स्नान करून आज भाविक विठुरायाच्या दर्शन रांगेत उभे राहतात. या भाविकांना उद्या संध्याकाळीनंतर दर्शन होते, त्यामुळे आधी चंद्रभागेचे स्नान मग विठ्ठल दर्शन या परंपरेनुसार चंद्रभागेवर आज स्नानासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केल्याने चंद्रभागा वाळवंट भाविकांनी फुलून गेलं आहे. काही दिवसापूर्वी उजनीतून सातत्याने चंद्रभागा नदीत पाणी सोडण्यात येत असल्याने चंद्रभागेची पाणीपातळी वाढली होती. अगदी पुंडलिकाच्या दर्शनाला देखील पाण्यातून रांग लावावी लागत होती. ABP माझाने हे वास्तव मांडल्यावर आता उजनीतून सोडण्यात येणारे पाणी बंद झाले असून यामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळी पुन्हा सर्वसामान्य झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्नान करता येत आहे.