पंढरपूर : देशभरातील गोरगरीब भाविकांनी विठुरायाला अर्पण केलेल्या लहान लहान सोने चांदीच्या दागिन्यांना आता वितळविण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. ABP माझाच्या पाठपुराव्यामुळे 36 वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि अत्यंत जोखमीचा प्रश्न मार्गी लागला आहे.
गोरगरीब भाविकांनी अर्पण केलेले हे लहान दागिने देवाला वापरता येत नसल्याने ते गेली वर्षानुवर्षे पोत्यात बांधून खजिन्यात ठेवण्यात आले होते. या लहान दागिन्यात 28 किलो सोने आणि 996 किलो चांदीचे दागिने होते. आता राज्य सरकारने दिलेल्या परवानगी नुसार औरंगाबाद येथील विधी व न्याय विभागाचे सहसचिव सुभाष कऱ्हाळे यांच्या उपस्थिती तीन मंदिर समिती सदस्य आणि मंदिराचे कार्यकारी अधिकारी अशा पाच जणांची समितीच्या मार्गदर्शनाखालीय हे सोने चांदी वितळविण्याचे काम मुंबई येथील केंद्र सरकारच्या रिफायनरी मध्ये केले जाणार आहे.
यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सध्या देवाकडे असलेल्या 28 किलो सोन्यापैकी 9 किलो सोन्याचे दागिने देवाला वापरता येण्यासारखे असल्याने ते ठेवले जाणार असून 19 किलो सोने वितळविण्यात येणार आहे. तसेच एकूण 996 किलो चांदीपैकी 571 किलो चांदीचा वापर देवासाठी केला जाणार असल्याने 425 किलो चांदी वितळविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
कार्तिकी यात्रेनंतर वितळविण्यात येणारे सोने आणि चांदीच्या दागिन्यातील दोरे, खडे, हिरे, माणके या पाच जणांच्या समितीच्या देखरेखीखाली वेगळे केले जाणार करून व्यवस्थित ठेवले जाणार आहेत. उरलेले सोने आणि चांदी यांचा विमा उतरवून ही सर्व चोख सुरक्षा व्यवस्थेत मुंबई येथे वितळविण्यासाठी नेली जाणार आहे. सुरुवातीला सर्व सोने आणि चांदी वितळवून त्याचे दोन दोन सॅम्पल तुकडे बाजूला काढले जाऊन मग सर्व सोने चांदीचे शुद्धीकरण केले जाईल.
शासन आदेशानुसार या दागिन्यांतून निघणाऱ्या शुद्ध सोने आणि चांदीच्या विटा बनविण्यात येऊन त्या मंदिर समितीकडे सुपूर्द केल्या जातील. यासाठी मंदिर समितीच्या सदस्यांची निवड आणि सोने वितळविण्याची तारीख मंदिर समितीच्या बैठकीत केली जाणार आहे. राज्य सरकारने नेमलेले सहसचिव कऱ्हाळे याना 10 दिवसासाठी मंदिराकडे नियुक्त केले जाणार असल्याने आता कार्तिकी यात्रेनंतर तातडीने हि प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे आता गोरगरीब भाविकांनी श्रद्धेने आपल्या लाडक्या विठुरायाला अर्पण केलेले सोन्या चांदीच्या वस्तू विटांच्या रूपात देवाच्या खजिन्यात कायमस्वरूपी राहणार आहेत.
संबंधित बातम्या :
- ST Workers Strike : एसटी संपामुळे वारकऱ्यांना कार्तिकी यात्रेची वाट खडतर, रेल्वेने सोडल्या दोन जादा गाड्या
- Kartiki Ekadashi 2021 : शासनाच्या निर्णयापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्तिकी यात्रेची नियमावली जाहीर; प्रशासनाकडून तयारी पूर्ण
- दोन वर्षानंतर कार्तिकी यात्रा होणार असल्याने पंढरपुरात दिवाळी जोरात, व्यापाऱ्यांना कार्तिकीचे वेध