औरंगाबाद : औरंगाबादमध्ये (Aurangabad) शिवसेनेकडून (Shiv Sena) आक्रोश मोर्चा (Aakrosh Morcha) काढण्यात आला. महागाई विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.  संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादेत निघणार आक्रोश मोर्चा. महागाईविरोधात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. 


केंद्राची ही एक प्रकारची निजामशाही- संजय राऊत


यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महागाई ही राष्ट्रीय समस्या आहे. आपला आक्रोश दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. महागाई प्रचंड वाढली आहे, त्यामुळं रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याची गरज आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळं देशात 17 हजार व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आमचा आक्रोश हा अन्यायाविरुद्ध आहे. ही एक प्रकारची निजामशाही आहे. हा महागाईचा हल्ला अन्यायकारी आहे, असं संजय राऊत म्हणाले. राज्यात आपलं सरकार आहे पण सरकारला काम करुन द्यायचं नाही. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स नेत्यांच्या दारी पाठवून नाकेबंदी केली जात आहे, असं ते म्हणाले. केंद्राकडून राज्याची आर्थिक कोंडी केली जात आहे. सामान्य लोकांचा संबंध नसलेल्या गोष्टी समोर आणून भरकटवण्याचं काम सुरु आहे, असं ते म्हणाले. राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशा दंगली भडकावून राज्याला आग लावायची आणि मग सांगायचं की ह्यांना राज्य करता येत नाही, राज्य सरकार बरखास्त करा, असे कारस्थान राज्यातल्या विरोधी पक्षाने चालवला आहे. याला केंद्र सरकारची साथ आहे. या सर्वांना औरंगाबादचा आक्रोश मोर्चा हा एक इशारा आहे, असं राऊत म्हणाले. 


नियमांना शिवसेना नेत्यांकडून हरताळ
सरकारच्या नियमांना शिवसेना नेत्यांकडून हरताळ फासला गेल्याचं या मोर्चात पाहायला मिळालं. कोविड निकषांप्रमाणे मोर्चाला परवानगी नाही. तरीही मोर्चात सरकारचे मंत्री आमदार आणि खासदार आणि सहभागी झाले. मोर्चाला पोलिसांची परवानगी नसल्यानं आयोजकांवर कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्त निखील गुप्ता म्हणाले.  


या आक्रोश मोर्चाविरोधात मनसेकडून "दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण" अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. औरंगाबादेत महापालिका वसूल करत असलेल्या पाणीपट्टीबद्दल यावर मजकूर लिहिण्यात आला आहे. आज शिवसेनेकडून महागाईविरोधात इथं आक्रोश मोर्चा काढण्यात आला.


इम्तियाज जलील म्हणाले...
या मोर्चाबद्दल बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचा आक्रोश महामोर्चा म्हणजे नाटक. मोर्चाने भाव कमी होत असतील आणि तुम्हाला लोक हवे असतील तर भगवे झेंडे घेऊन आमचे लोक मोर्चात उतरायला तयार आहेत. लोक प्रश्न विचारतील म्हणून अशा प्रकारचा नाटक केलं जातं. आधी लाईटचे भाव कमी करा,टॅक्सेस कमी करा, पेट्रोलमधील तुमचे टॅक्स कमी करा आणि नंतर मोर्चे काढा. लोक येत नाहीत मोर्चाला म्हणून मुंबईतून नेते बोलवले आहेत, असं जलील म्हणाले.