पंढरपूर : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास याची खूणगाठ वर्षनुवर्षे मनाशी पक्की करून लालपरीमधून पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांना यंदा मात्र जीवावर उदार होऊन खाजगी वाहनातून असुरक्षित प्रवास करीत विठुरायाच्या भेटीसाठी यावे लागणार आहे. एसटीच्या संपामुळे राज्यातील लालपरीच्या चाकांना ब्रेक लागल्याने दोन वर्षानंतर होत असलेल्या कार्तिकी यात्रेला लाखो वारकरी पंढरपूरला येणार आहेत. मात्र सर्वसामान्य गोरगरीब वारकऱ्यांना आता खिशाला कात्री लावून खाजगी वाहनाने आणि असुरक्षित प्रवास करून पोहोचावे लागणार आहे. राज्य सरकारकडून वारकऱ्यांची सोय केली नसल्याने वारकरी संप्रदाय शासनावर भलताच नाराज झाला आहे. 


दोन वर्षांपूर्वी 2019 च्या कार्तिकी यात्रेत एसटी महामंडळाने 9 लाख किलोमीटरचा प्रवास करीत 2 लाख 21 हजार 366 वारकऱ्यांची वाहतूक केली होती. त्यावेळी एसटी महामंडळाला तब्बल 4 कोटी 39 लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले होते. मात्र गेल्या 7 नोव्हेंबर पासून पंढरपूर आगारातून एकही बस सुटली नसल्याने आता शासनाने आरटीओ विभागाला हाताशी धरून पंढरपूर बस स्थानकावरील फलाटावर वडाप वाहतूक करणाऱ्या खाजगी जीप आणून त्यानून वाहतूक सुरुवात केली आहे.


एकतर ही वाहतूक अत्यंत असुरक्षित असली तरी प्रशासन मात्र आपत्कालीन परिस्थितीमुळे ही व्यवस्था उभी करत असल्याचे आरटीओ घेवारे यांनी माझाशी बोलताना सांगितले . एस्टीच्याच दरात वारकर्यांना सुखकर प्रवास घडविण्याकडे आम्ही लक्ष देत असल्याचे प्रशासन सांगत असले तरी अशा बेभरवशाच्या गाड्यातून विठ्ठल भक्तांना जीवावर उदार होत वारी करावी लागणार आहे. 


दुसऱ्या बाजूला रस्त्यावर लाखो भाविकांना घेऊन जाणाऱ्या तेवढ्या गाड्या कशा येणार हा वारकरी संप्रदायाला प्रश्न पडला असून यंदा 20 हजारापेक्षा जास्त खाजगी वाहनांचा वापर होण्याची शक्यता आहे . या येणाऱ्या जादाच्या खाजगी वाहनांच्या पार्किंग साठी व्यवस्था उभी करण्याचे आवाहन आता पोलिसांसमोर आहे. यात्रेसाठी तब्बल साडेतीन हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यात्रा बंदोबस्तासाठी कोविड चाचण्या करून दाखल करून घेतले आहे.


सुदैवाने या चाचण्यांत एकही पोलीस कर्मचारी पॉझिटीव्ह आढळलेला नाही . मात्र हा सर्व पोलीस बंदोबस्त कार्तिकीला शहरात अडकणार असल्याने रस्त्यावर होणाऱ्या हजारो खाजगी वाहनांच्या सुरक्षित प्रवासासाठी आता शासनाला वेगळी यंत्रणा उभी करावी लागणार आहे . यंदा दोन वर्षानंतर कार्तिकीचा महासोहळा होत असताना येणाऱ्या लाखो विठ्ठल भक्तांना हि यात्रा सुरक्षित घडावी एवढेच साकडे सध्या सर्वसाधारण वारकरी विठुरायाकडे करीत आहे.