Pandharpur News : कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या जास्तीतजास्त भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ देण्यासाठी कालपासून देवाचे राजोपचार बंद करून 24 तास दर्शन व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. काल (शनिवारी) पहिल्यांदाच संध्याकाळी धुपारतीनंतर विठ्ठल रुक्मिणीचा पलंग काढण्यात आला आहे. देवाचा पलंग निघतो म्हणजेच, देवाची रात्रीची विश्रांती बंद होत असते. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळे देवाची झोप बंद होते अशी प्रथा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे पलंग निघत होता, मंदिरही 24 तास खुले राहायचे, मात्र मंदिरात भाविकांना प्रवेश नसायचा. यंदा कार्तिकी यात्रा होण्याची शक्यता असल्यानं कार्तिकी यात्रा काळात आजपासून 24 नोव्हेंबरपर्यंत लाखो भाविकांना 24 तास दर्शन मिळणार आहे.
काल (शनिवारी) मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर विठुरायाच्या पाठीला लोड तर रुक्मिणी मातेच्या पाठीला तक्क्या लावण्यात आल्यात. चोवीस तास दर्शनाला उभारून देवाला शिणवटा जाणवू नये यासाठी विठ्ठल रुक्मिणीच्या पाठीला मऊ कापसाचा लोड आणि तक्क्या लावण्याची परंपरा आहे. इतर वेळा विठुरायाच्या राजोपचाराला पहाटे 4 वाजल्यापासून सुरुवात होत असते. ती रात्री शेजारती पर्यंत म्हणजे रात्री साडेअकरा वाजता मंदिर बंद होत असते. आता देवाचा पलंग निघाल्यामुळे दिवसभरात सकाळी देवाचे स्नान नित्यपूजा, दुपारी महानैवेद्य आणि संध्याकाळी लिंबूपाणी एवढ्याचसाठी दर्शन बंद राहणार असून उरलेल्या सर्व वेळात दिवसरात्र देव अखंड दर्शनासाठी उभा असणार आहे. सर्वसाधारणपणे यात्राकाळात म्हणजे 24 नोव्हेंबरपर्यंत मंदिर 24 तास दर्शनासाठी उघडे राहणार आहे. यामुळे यात्राकाळात तासाला अडीच ते तीन हजार भाविकांचे दर्शन होत असल्याने दिवसभरात लाखभर भाविकांना विठुरायाच्या दर्शनाचा लाभ मिळू शकणार आहे.
सोन्या-चांदीचे दागिने वितळवून नवे अलंकार करण्याचा निर्णय; पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय
देशभरातील भाविकांकडून विठुरायाला प्रेमाने आणि भक्तिभावाने अर्पण केलेले लहान-लहान सोन्या-चांदीचे दागिने वितळवून विठ्ठल रुक्मिणीला नवे अलंकार बनविण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एबापी माझाने या बाबत एक बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन हा निर्णय घेतला.
मंदिर समितीकडे 1985 सालापासून जवळपास 28 किलो सोन्याचे आणि 996 किलो चांदीचे हजारो लहान-लहान दागिने जमा झाले होते. याची संख्या मोठी असल्याने समितीला हे सोन्या-चांदीचे दागिने पोत्यात भरून ठेवण्याची वेळ आली होती .आज झालेल्या बैठकीत या दागिन्यांचे नवे अलंकार बनविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माझाशी बोलताना सांगितले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Kartiki Ekadashi : विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर! कोरोना नियम पाळत यंदा कार्तिकी यात्रा होण्याचे संकेत
- दोन वर्षानंतर कार्तिकी यात्रा होणार असल्याने पंढरपुरात दिवाळी जोरात, व्यापाऱ्यांना कार्तिकीचे वेध
- ABP Majha Impact: सोन्या-चांदीचे दागिने वितळवून नवे अलंकार करण्याचा निर्णय; पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय