पालघर : अंगात कालिका माता येते, सात दिवसाची पूजा करून, घरातील दोष काढून टाकतो असं सांगून एका भोंदू बाबाने वसईतील महिलेसह, एका कुटुंबाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात या भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 


पोलिसांच्या ताब्यात असणारा तो 32 वर्षांचा भोंदूबाबा आहे. नूर अजीजउल्ला सलमानी असं या भोंदूबाबाचं नाव आहे. तो मिरा रोडचा राहणारा आहे. आशा प्रजापती असं फसवणूक झालेल्या महिलेचे नाव असून, या महिलेच्या 'विजय वडापाव' नावाचे हॉटेल आहे. अंगात कालिका माता येते, तुमच्या घरात सात दिवसाची पूजा घालावी लागेल, तुमच्या घरातील सर्व सोन्या चांदीचे दागिने पूजेला ठेवावे लागतील, असं सांगून भोंदूबाबाने त्यांचा विश्वास संपादन करून घरात पूजा घातली.


पूजेला ठेवलेले सोन्याचे दागिने काढून, एका कपड्यात माती, दगड ठेवून ते एका कपड्यात बांधून कुटुंबांच्या हातात देऊन बाबा निघून गेला होता. हातात दिलेले ते कापड सात दिवसानंतर उघडून पहा असेही सांगितले. सात दिवसांच्या नंतर कुटुंबियांनी ते कापड उघडलं असता त्यात माती, दगड निघाल्याने त्यांना धक्काच बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी भोंदूबाबावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.


वसईच्या माणिकपूर पोलिसांनी अटक केलेल्या या भोंदूबाबाने मागच्या चार वर्षात अनेक कुटुंबियांना फसवले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. वसई, विरार, ठाणे, नवी मुंबई, गुजरात वापी, या परिसरात ही फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे. नालासोपारा, माणिकपूर, तसेच मुंबईतील कस्तुरबा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तीन गुन्ह्यात 12 लाख 5 हजार 200 रुपये किमतीचे 301.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. नागरिकांनी अशा भोंदूबाबांच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 


महत्वाच्या बातम्या :