पंढरपूर : कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव असणाऱ्या आषाढी कार्तिकी यात्रा होऊ शकल्या नाही.  पण यंदा कोरोनाचे नियम पाळून वारकरी संप्रदायाची कार्तिकी यात्रा भरवण्याचे संकेत मिळाले असून प्रशासन कामाला लागले आहे.


वारकरी संप्रदायाला आषाढी, कार्तिकी हा दिवाळी सणाएवढाच महत्वाचा असतो. राज्यभरातून हजारो भाविक या  यात्रेसाठी पंढरपूरला येत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे वारकरी संप्रदायाच्या यात्रा काळात पंढरपूरमध्ये संचारबंदी लावण्याची वेळ शासनावर आली होती. आता कोरोनाचे संकट कमी झाले असून लसीकरण देखील मोठ्या प्रमाणात झाल्याने राज्य सरकारने निर्बंध हटवले आहेत . त्यामुळे यंदा 15 नोव्हेंबर रोजी होणार कार्तिकी यात्रेचा सोहळा कोरोनाचे नियम पाळून व्हावा या वारकरी संप्रदायाच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दाखवल्याचे संकेत मिळाल्याने आता प्रशासन देखील तयारीला लागले आहे . 


याबाबत थेट बोलणे प्रशासकीय अधिकारी टाळत  असले तरी यात्रेसाठी प्रशासन तयारीला लागले असून शासनाने आदेश दिल्यास कोरोनाच्या नियमांचे पालन करून  कार्तिकी सोहळा केला जाऊ शकतो असे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. ठरलेल्या संकेतानुसार कार्तिकी एकादशीची महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे करणार असून मंदिर समितीकडून त्यांना रीतसर निमंत्रण देण्यात येणार असल्याचे गुरव यांनी सांगितले. दरम्यान विठुरायाने कोरोना पळवला आता मुख्यमंत्र्यांनी कार्तिकी यात्रा भरवावी आणि देव आणि वारकऱ्यातील दुरावा संपवावा अशी मागणी वारकऱ्यांना होत आहे.


कोरोनाची एकंदर परिस्थिती पाहता उपमुख्यमंत्र्यांनी यंदा कोरोना नियम पाळून कार्तिकी सोहळा भरवण्याचे संकेत दिल्याने आता दोन वर्षानंतर पुन्हा सर्वसामान्य वारकऱ्याला कार्तिकी सोहळा पंढरपूरमध्ये साजरा करता येणार आहे. दरम्यान राज्यातील मंदिरे उघडली असली तरी कोरोनाचा धोकाही संपलेला नाही. 


Pandharpur News : विठ्ठल चरणी अर्पण करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या दागिन्यांबाबत विधी व न्याय विभाग गंभीर नाही?