Helavi Samaj History : मराठवाड्यातील मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्यासाठी 50 ते 100 वर्षांच्या पूर्वीच्या निजामकालीन नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. गावागावांतील या नोंदी शोधणे म्हणजे लोकांसाठी आणि सरकारसाठी एक आव्हानात्मक काम. पण दक्षिण महाराष्ट्रात आणि सीमाभागातील लोकांच्या वंशावळीच्या या नोंदी गेल्या 700 ते 800 किंवा त्याहून अधिक वर्षांपासून ठेवल्या गेल्याचं दिसून येतंय आणि तेही मूठभर उरलेल्या हेळवी समाजाकडून.


डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटा, अंगावर पांढरा सदरा, खांद्यावर गुलाबी उपरणे आणि त्यात गुंडाळलेली वंशावळ नोंदीची पोतडी, कन्नड लकबीमध्ये मराठी बोलणे. हे असं जर चित्र दक्षिण महाराष्ट्रात दिसलं की समजून जायचं की तो हेळवी आहे... त्याच्याकडे गावातील पंधराएक पिढ्यांच्या वंशावळीच्या नोंदी आहेत.





दक्षिण महाराष्ट्रातील गावागावांतील वंशावळ नोंद 


हेळवी समाज हा मूळचा बेळगाव (Belgaon Helavi News) जिल्ह्यातील. सध्या चिकोडी, अथनी, कागवड या परिसरात हा समाज राहतोय. पण यांच्याकडे संपूर्ण कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि बेळगाव या जिल्ह्यातील गावागावांच्या वंशावळीचे रेकॉर्ड आहे.


हेळवी लोकांना कन्नड आणि मराठी या दोन्ही भाषा यांना येतात. हेळव्याच्या वंशवळीच्या सगळ्या नोंदी या मोडी लिपीत असतात.




पाय झाकून वंशावळ सांगतात 


गावातील लोकांची वंशावळ सांगणे, कुळाचा इतिहास सांगणे आणि नवनवीन नोंदणी ठेवणे हे हेळव्यांचं पारंपरिक काम.


निपाणी तालुक्यातील नंदी येथे राहणारे भरमा हेळवी यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी अधिकची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, हेळवी समाजाचा मूळ पुरुष लंगडा असल्यामुळे तो नंदीबैलावरून फिरायचा. नंतरच्या काळात नंदीबैलाची जागा बैलगाडीने घेतली. त्यामुळेच हेळवी लोक वंशावळ सांगताना मांडी घालून बसतात.


प्रत्येक हेळव्याकडे एकाच परिसरातील 10 ते 15 गावं असतात. दर दोन-तीन वर्षातून तो या गावांना भेटी देतो. साधारणपणे दिवाळीनंतर हेळवी आपली पोतडी घेऊन घराबाहेर पडतो असं अथनीतील अण्णासो हेळवी सांगतात.





वंशावळीचं वर्णन कसं करतात?


हेळवी आपली वंशावळ सांगताना आपल्या घराचा मूळ पुरुष कोण आणि मूळ गाव कोणतं ते सांगतो. आपले कुलदैवत, गोत्र, जमीन, संपत्ती याची माहिती सांगतो. मूळ पुरुषाने का आणि कधी स्थलांतर केलं, सध्याच्या गावापर्यंत कसे आले हे सांगतो. 


भरमा हेळवी सांगतात की, पूर्वी हेळवी वंशवळीच्या नोंदी या ताम्रपटावर नोंदवून ठेवायचे.  नंतर ताम्रपट (Tamrapat) बंद होऊन कागदांच्या पोतड्यावर त्यांनी नोंदी करायला सुरू केल्या. विशिष्ट पद्धतीने शिवलेल्या त्यांच्या नोंद वहीतील कागदं जीर्ण व्हायला लागल्यावर नव्या वहीत पुन्हा सगळ्या नोंद केल्या जातात.


दक्षिण महाराष्ट्रातील सर्व हेळव्यांच्या नोंदी, जुनी ताम्रपटं ही बेळगावमधील अथनी (Belgaon Helavi Registration) रजिस्टर ऑफिस या ठिकाणी एकत्रित ठेवण्यात आली आहेत. शासनाच्या दप्तरी ज्या पद्धतीने नोंदी केल्या जातात त्याच पद्धतीने हेळव्याकडे नोंदी ठेवल्या जातात, त्याही गेल्या 14-15 किंवा त्याहून जास्त पिढ्यांच्या हे विशेष.


Maratha Kunbi Certificate : कुणबी प्रमाणपत्रांसाठी हेळव्यांच्या नोंदीचं महत्व 


पश्चिम महाराष्ट्रात मराठ्यांना पूर्वी कुणबी समाजाचा दाखला काढण्यासाठी किंवा इतर काही कामांसाठी हेळव्यांकडे असलेल्या वंशावळीच्या नोंदी ग्राह्य धरण्यात येत होत्या. कुणबी नोंदीचं महत्व लक्षात आलं तेव्हा आपली वंशावळ, त्यात कुणबी शब्द शोधताना हेळव्याच्या नोंदीचा खूप उपयोग झाला. नंतर महाराष्ट्र सरकारने जात प्रमाणपत्रांसाठी या नोंदी ग्राह्य धरण्यास नकार दिला. पण बेळगाव आणि कर्नाटकात आजही या नोंदी सरकारी कामासाठी अधिकृत दस्तऐवज मानली जातात. ग्रामीण भागात हेळव्यांनी दिलेल्या साक्ष ग्राह्य धरतात.


बदलत्या काळात हेळवी समाजातील वंशावळ सांगणाऱ्या लोकांची संख्या आता मुठभर राहिल्याचं सांगितलं जातंय. भटकंती करत वंशावळी सांगण्याचं पारंपरिक काम करण्याकडे नवीन पीढीचा ओढा नाही. त्यामुळे आता या हेळव्यांची संख्याही कमी होताना दिसतेय. बेळगाव जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वंशावळ सांगणाऱ्या हेळव्यांच्या कुटुंबाची संख्या आता 300 च्या आसपास उरली आहे. त्यामुळे हजारो वर्षांच्या वंशावळीची माहिती नोंद करून ठेवणारे हा हेळवी समाज शासनाकडून मदतीची अपेक्षा करतोय. 


(या लेखासाठी प्रणव पाटील यांचे फोटो त्यांना सौजन्य देऊन वापरले होते, मात्र त्यांच्या आक्षेपानंतर ते काढले आहेत. तसंच या लेखासाठी माहिती संकलीत करताना बेळगाव जिल्ह्यातील नंदी या गावचे भरमा हेळवी आणि अथनीतील अण्णाप्पा हेळवी यांच्याशी चर्चा केली आहे)

ही बातमी वाचा: