सातारा : विजया निकम, साताऱ्यातील या 20 वर्षीय तरुणीने जन्मापासून आपला वाढदिवस साजरा केलेला नाही. याचं कारणही मन हेलावणारं आहे. 26 जून 1999 रोजी मराठा लाईट इन्फ्रंट्रीमधील तिचे वडील शिपाई महादेव यशवंत निकम यांना जम्मू काश्मीरमध्ये कारगिल युद्धात लढताना वीरमरण आलं. 26 जून रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास महादेव निकम यांनी घरात अखेरचा फोन केला होता. त्यानंतर तीन तासांनी विजयाचा जन्म झाला. जन्मापासून विजयाला वडील फक्त कोणाच्या तरी आठवणींमधूच भेटले.


विशेष म्हणजे कारगिल युद्धातील 'ऑपरेशन विजय'वरुन तिचं नाव विजया ठेवण्यात आलं आहे. "मी माझा वाढदिवस कधीच साजरा करु शकत नाही," असं विजया सांगते. विजया साताऱ्याच्या शिवाजी महाविद्यालयात शिकत असून ती एनसीसीची विद्यार्थिनी आहे.

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा तिचा निर्धार आहे. माझे वडील किती शूर होते, ते देशासाठी कसे लढले आणि ज्या कामावर त्यांचं प्रेम होतं, ते करताना त्यांना कसं हौतात्म आलं, या गोष्टी ऐकूनच विजया मोठी झाली आहे. "मला आशा आहे की, मी देखील त्यांच्यासारखं बनू शकेन," असं विजया म्हणाली.

शेवटच्या कॉलवर काय संभाषण झालं?

साताऱ्याच्या कराड तालुक्यातील आंतवाडी या गावात महादेव यशवंत निकम यांचा जन्म झाला. 24 ऑगस्ट 1994 रोजी त्यांची भारतीय सैन्याच्या सातव्या मराठा लाईट इन्फ्रंट्रीमध्ये नियुक्ती झाली. तर 26 जून 1999 रोजी त्यांना वीरमरण आलं. उत्साही, मेहनती आणि शिस्तप्रिय जवान, असा संदेश त्यांच्या मृत्यूनंतर लिहिण्यात आला होता.

महादेव निकम यांच्या पत्नी उज्ज्वला 26 जून 1999 या दिवसाची आठवण सांगताना म्हणाल्या की, "ही जणू काही कालचीच गोष्ट आहे. मी नऊ महिन्यांची गर्भवती होते आणि रहिमतपूर इथे माहेरी राहत होते. ते कोणत्याही वेळेला फोन करायचे. त्यादिवशी त्यांनी पहाटे साडेपाचच्या सुमारास कॉल केला. आमचं संभाषण फारच थोडक्यात आटोपलं. त्यांनी माझ्या तब्येतीच, आमच्या आई-वडिलांची चौकशी केली आणि इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. युद्धविराम कधी होईल असं मी त्यांना विचारलं. त्यावर इथली परिस्थिती तणावाची असल्याचं ते सहजच बोलून गेले."

एकीकडे आई झाल्याचं सुख, दुसरीकडे पतीला गमावल्याचं दु:

“यानंतर तीन तासांनी विजयाचा जन्म झाला. त्याचवेळी उज्ज्वला निकम यांच्या काकांना शिपाई महादेव निकम शहीद झाल्याचं सांगण्यासाठी फोन आला. आपल्याला मुलगी झाली हे सांगण्यासाठी मी फारच उत्साही होते. पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. या दोन्ही बातम्यांमुळे कुटुंबात संमिश्र भावना होत्या. एकीकडे आई झाल्याची सुखवार्ता होती त्याचवेळी पतीला गमावल्याची दु:खद बातमीही होती,” असं उज्ज्वला निकम यांनी सांगितलं.

"खरंतर ही बातमी मला लगेच सांगितली नव्हती. सासू-सासरे आजारी असल्याचं सांगून मला सासरी नेलं. तिथे गेल्यावर जे पाहिलं, तेव्हा माझ्या पायाखालची जमिनच सरकली. तिरंग्यात गुंडाळलेली शवपेटी समोर होती. माझी शुद्ध हरपली. मला रुग्णालयात नेलं. बरी होण्यासाठी मला दोन दिवस लागले," हे सांगताना उज्ज्वला निकम यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

पतीसोबतच्या आठवणीत आनंदी

"बऱ्याच नातेवाईकांनी मला पुन्हा लग्न करण्याचा सल्ला दिला. मला पती आणि विजयाला पिता मिळावा, अशी त्यांची इच्छा होती. पण मी शहीद पत्नी आहे. माझ्या पतीने देशासाठी लढताना आपले प्राण दिले. म्हणून मी माझ्या तारुण्याचा आमच्या मुलीसाठी त्याग केला," असं त्या म्हणाल्या.

उज्ज्वला निकम पुढे म्हणाल्या की, “पुन्हा लग्न करुन एक ध्येय समोर ठेवून मी विजयाचं संगोपन करु शकले नसते. पतीसोबतच्या आठवणीत मी आनंदी आयुष्य जगत आहे. विजयाला एनसीसीच्या युनिफॉर्ममध्ये पाहून माझा ऊर अभिमानाने भरुन येतो. ती माझ्या जगण्याचं  कारण आहे.”

पतीच्या मृत्यूनंतरचे पहिली पाच वर्ष उज्ज्वला निकम त्यांच्या आई-वडिलांसोबत माहेरी राहिल्या. विजयाला साताऱ्यातील इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश मिळावा म्हणून त्या सासरी परतल्या. तिच्या शाळेची फी भरण्यासाठी तसंच तिला वाढवण्यासाठी सरकारकडून सवलत मिळाली होती.

राजपथावर संचलनासाठी विजयाची तयारी

मागील दोन वर्षात झालेल्या एनसीसीच्या अनेक कार्यक्रमात विजया सहभागी झाली होती. पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनाच्या निवड कॅम्पसाठी विजया तयारी करत आहे. "मला युनिफॉर्ममध्ये पाहून वडिलांना फारच आनंद झाला असता," असं विजया सांगते.

महादेव निकम यांची पेंशन आणि साठवलेल्या पैशांमधून उज्ज्वला यांनी घर बांधलं असून त्याला ‘शहीद महादेव यांचं घर’ असं नाव दिलं आहे.

कारगिल युद्धात भारताचा पाकिस्तानवर विजय

जम्मू काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेत घुसखोरी केल्यानंतर 3 मे 1999 रोजी कारगिल युद्धाला सुरुवात झाली. भारताच्या 'ऑपरेशन विजय' अंतर्गत तीन महिन्यांनी कारगिल युद्धाला विराम मिळाला. भारतीय वीरजवानांनी कारगिलमधून पाकिस्तान सैन्याना हुसकावून लावलं आणि पाकिस्तानवर विजय मिळवला. या युद्धात 500 हून अधिक भारतीय जवान शहीज झाले तर 1300 जवान जखमी झाले. हे युद्ध 26 जुलै 1999 रोजी संपलं, त्यामुळे आजचा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून स्मरण केला जातो.