नवी दिल्ली : कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका निभावलेले योगेंद्र सिंह यादव देशातील 21 परमवीर चक्र पुरस्काराने सन्मान झालेल्यांपैकी एक आहेत. योगेंद्र सध्या 18 ग्रेनेडियर्समध्ये सुभेदार पदावर बरेली येथे कार्यरत आहेत. कारगिल युद्धात त्यांनी दाखवलेल्या साहसासाठी त्यांचा परमवीर चक्र पुरस्काराने सन्मान करण्यात आला. मृत्यूची पर्वा न करता 15 गोळ्या अंगावर लागल्या असतानाही योगेंद्र यांनी शत्रूचा मोठ्या हिमतीने सामना केला आणि टायगर हिल्सवरुन पाकिस्तानी सैन्याला परत फिरण्यास भाग पाडलं.


योगेंद्र उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील औरंगाबाद अहीर गावचे रहिवाशी आहेत. योगेंद्र यांचे वडील रामकरन यादव हे देखील लष्करात होते. 1965 आणि 1971 च्या युद्धात ते सहभागी होते. पुढे युद्धातील शौर्यगाथा ते आपल्या मुलांना सांगत असत.


वडिलांकडून प्रेरणा घेत योगेंद्र हे अवघ्या 17 व्या वर्षी सैन्यात सामील झाले. 27 डिसेंबर 1997 रोजी त्यांनी सैन्यात नोकरी सुरु केली. त्यानंतर मे 1999 मध्ये त्यांनी लग्न केलं आणि लग्नाच्या पंधराव्या दिवशीच म्हणजे 20 मे 1999 रोजी त्यांना बॉर्डरवर जाण्याचे आदेश मिळाले. तोपर्यंत कारगिल युद्ध सुरु झालं होतं. बॉर्डरवर परिस्थिती गंभीर बनली होती. मात्र हेच कारगिल युद्ध योगेंद्र यांना नवी ओळख देणार होतं. 22 जून 1999 मध्ये योगेंद्र यांना तोलोलिंग शिखरावर तैनात करण्यात आलं.


22 दिवस याठिकाणी युद्ध सुरु होतं. त्यानंतर त्यांना 12 जुलै रोजी टायगर हिल्सवर जाण्याचे आदेश देण्यात आले. रक्त गोठवणाऱ्या थंड वातावरणात शत्रूला तोंड देताना दुहेरी संकट भारतीय जवानांसमोर होतं. भारतीय जवान रात्रीच्या वेळी टायगर हिल्सवर चढत असत, जेणेकरुन समोर-समोर लढाई व्हावी. उंचीवर असल्याचा पाकिस्तानी घुसखोरांना फायदा मिळत होता.


योगेंद्र यांच्या सोबतचे अनेक जवान शत्रूचा सामना करताना शहीद झाले, मात्र योगेंद्र यांचा आत्मविश्वास डगमगला नाही. योगेंद्र यांचा एक हात यादरम्यान मोडला होता, मात्र त्यांनी हार मानली नाही. ग्रेनेड संपल्यानंतर त्यांनी बंदूक हातात घेतली आणि अनेक घुसखोरांचा खात्मा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि त्यांनी टायगर हिल्सवर तिरंगा फडकवला. टायगर हिल्सवर कब्जा केल्यानंतर काही वेळातच योगेंद्र बेशुद्ध पडले.


डॉक्टरांनी योगेंद्र यांची तपासणी केली तेव्हा त्यांना 15 हून अधिक गोळ्या लागल्याचं निष्पन्न झालं. मात्र तरीही ते जिवंत होते याचं डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. अनेक महिन्यांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती सुधारली. योगेंद्र यांनी केलेल्या या साहसी पराक्रमाबद्दल त्यांना वयाच्या 19 व्या वर्षी परमवीर चक्रने सन्मानित करण्यात आलं. योगेंद्र यांच्यासारखे हजारो जवान कारगिल युद्धात जीवाची पर्वा न करता देशाच्या संरक्षणासाठी लढले.


8 मे ते 26 जुलै दरम्यान झालेल्या कारगिल युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले, तर 1363 जवान जखमी झाले होते. या सर्वांना मानवंदना देण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो.


VIDEO | गोष्ट कारगिल युद्धात पाकिस्तानला जेरीस आणणाऱ्या नचिकेताची | स्पेशल रिपोर्ट