मुंबई : कल्याण- डोंबिवली पालिकेच्या ( Kalyan Dombivli Municipality ) ठेकेदाराने तब्बल 34 लाख रूपयांची वीज (Electricity) चोरी केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर महावितरणकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. महावितरणचे सहायक अभियंता मोहम्मद शेख यांनी याबाबत कंपनी विरोधात तक्रार दिली आहे.  


कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात स्मार्ट सिटी योजनेतून स्टेशन परिसर विकासाचे काम सुरु आहे. या कामासाठी नेमलेल्या ठेकेदाराने स्टेशन परिसरातील महानगरपालिकेच्या पार्कींगच्या कामासाठी लागणाऱ्या विजेची चोरी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी महावितरणकडून एनसीसीसीएल-किंजल-केटीआयएल कन्सॉर्टियम कंपनी आणि त्याचा पर्यवेक्षक फौज सिंग यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सिंग याने आतापर्यंत 34 लाख 16 हजार 960  रुपयांची वीज चोरी केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.    


कल्याण डोंबिवली महापलिका क्षेत्रातील स्टेशन परिसर विकासाचे काम करण्यासाठी एनसीसीसीएल-किंजल-केटीआयएल कन्सॉर्टियम कंपनीला 500 कोटी रूपयांचे काम दिले आहे.  या ठेकेदाराकडून महानगरपालिकेच्या पार्कींगचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी चोरीची वीज वापरल्याचे उघड झाले आहे. महावितरणचे शिवाजी चौक शाखेचे सहायक अभियंता मोहम्मद शेख, दक्षता आणि अंमलबजावणी विभागाचे रामचंद्र मासाळे यांच्या पथकाने 19 डिसेंबरला या बांधकामाच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. या तपासणीत बांधकामाच्या कामासाठी फिडर पीलरमधून थेट वीजवापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. 


संबंधित ठेकेदार मागील वर्षभर अशा प्रकारे चोरीच्या विजेचा वापर करत असून जानेवारी ते डिसेंबर 2022 या कालावधीत 84 हजार 372 युनिट वीज चोरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार 34 लाख 16 हजार 960 रुपयांच्या चोरीच्या विजेचे देयक भरण्याची नोटीस कंपनीला बजावण्यात आली. परंतु, दिलेल्या मुदतीत या रकमेचा भरणा न झाल्याने सहायक अभियंता मोहम्मद शेख यांनी संबधित कंपनी विरोधात दिलेल्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी कंपनी आणि पर्यवेक्षक सिंग यांच्याविरुद्ध वीज कायदा 2003 च्या कलम 135 नुसार गुन्हा दाखल केला आहे. महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक सागर चव्हाण या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दरम्यान, याबाबत संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती महावितरणकडून देण्यात आलीय. 


महत्वाच्या बातम्या


Mumbai Baroda Highway Scam : मुंबई-बडोदा महामार्गात भूसंपादन घोटाळा, दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हडपले 2 कोटी 8 लाख रूपये